बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक दीपक तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ‘जो जीता वही सिकंदर’ आणि ‘आशिकी’सारख्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्याने त्याचे सहनिर्माते मोहन नाडर यांच्याविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मोहन नाडर यांनी आपली २.६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अभिनेत्याने केल्याचं स्पष्ट झालं आहे.
हे दोघे मिळून एका थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करत होते. आंबोली पोलीस ठाण्यात दीपक तिजोरीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून यासंदर्भातील तपास त्यांनी सुरू केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच ‘इटाईम्स’च्या वृत्तानुसार दीपक तिजोरीने मोहन नाडरकडून पैसे न मिळाल्याने १० दिवसांपूर्वी लेखी तक्रार केली होती.




आणखी वाचा : “मी लवकरच…” गंभीर दुखापतीवर मात करणाऱ्या अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट
हे पैसे शूट लोकेशनसाठी वापरण्याचं कारण देऊन मोहन नाडरने २.६ कोटी रुपये हडप केल्याची चर्चा सध्या होताना दिसत आहे. दीपक तिजोरी आणि मोहन नाडर यांनी २०१९ मध्ये ‘टिप्सी’ चित्रपटासाठी करार केला होता. याच चित्रपटासाठी दीपककडून २.६ कोटी रुपये मोहनने घेतले पण चित्रपट पूर्ण केला नाही. जेव्हा अभिनेत्याने पैसे मागितले तेव्हा मोहनने पेमेंटसाठी दिलेला चेक बऱ्याचदा बाऊन्स झाला. आंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
गेल्या महिन्यात ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीही इंस्टाग्रामवर या चित्रपटाचे अपडेट शेअर केले होते. दीपक तिजोरी ‘टिप्प्सी’ या साहसी-थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे त्यात स्पष्ट केले होते. तरण आदर्श यांनी लिहिले, “दीपक तिजोरीने या साहसी-थ्रिलर चित्रपटात दिग्दर्शन आणि अभिनयही केला आहे. या चित्रपटात पाच अभिनेत्री असणार आहेत.” महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या दीपक तिजोरीने ९० च्या दशकात बऱ्याच सुपरहीट चित्रपटात काम केलं आहे. लवकरच दीपक ‘इत्तर’ या चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.