दीपक तिजोरी ९० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेता होता. विशेषतः ‘आशिकी’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’, ‘कभी हा कभी ना’ सारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका खूप गाजल्या. मात्र, त्याच्या खऱ्या आयुष्यातील ‘लव्ह स्टोरी’ आणि त्याचं वैवाहिक जीवन हे कोणत्याही फिल्मी ड्रामापेक्षा कमी नव्हतं.
दीपक तिजोरीने शिवानी अनेजाशी लग्न केलं. शिवानी पेशाने फॅशन डिझायनर आहेत. या दोघांना समारा नावाची एक मुलगी आणि करण नावाचा मुलगा आहे. २०१७ मध्ये दीपक तिजोरीच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ आले. पत्नी शिवानीने त्यांना घरातून बाहेर काढल्याच्या बातम्या समोर आल्या. यावेळी दीपक तिजोरीने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले.
दिपक तिजोरीने पत्नीवर केलेले आरोप
२०१७ मध्ये दीपकला त्याची पत्नी शिवानी तिजोरी हिने गोरेगाव येथील त्याच्या घरातून हाकलून दिलं होतं. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय शिवानीला होता. नंतर शिवानीने त्याला घरात राहू दिलं, पण फक्त एकच खोली त्याला वापरता येत होती. तसेच घरातील कर्मचाऱ्यांना बजावलं होतं की त्यांनी दीपकला जेवणही देऊ नये. त्यानंतर दीपकला त्याच्या मित्राची मदत घ्यावी लागली होती, तो मित्राकडे राहायला गेला होता.
शिवानीने दीपकपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता आणि पोटगी मागितली होती. पण हे लग्न कायदेशीररित्या वैध नसल्याचा दावा दीपकने केला आणि या घटस्फोटाच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला होता. ‘बॉलीवूड शादी’च्या वृत्तानुसार, दीपकने सांगितलं की शिवानीशी त्याचं लग्न कायदेशीररित्या वैध नाही. कारण शिवानीने लग्न करण्यापूर्वी तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला नव्हता, त्यामुळे त्यांचे लग्न रद्दबातल ठरते. हा खुलासा झाल्याने या दोघांच्या नात्यातील गुंतागुंत आणखी वाढली आणि शिवानीने पोटगी मागितली होती त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
शिवानीने काय म्हटलं होतं?
वाद जास्त वाढल्यावर शिवानीने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आणि दीपकच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. “दीपक तिजोरी माझे २२ वर्षांहून जास्त काळ पती आहेत आणि ते माझ्या मुलीचे वडील आहेत. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी सभ्यता, नैतिकता, संवेदनशीलता, कायदेशीरतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत,” असं शिवानी म्हणाली होती. प्रकरण कोर्टात असल्याने तिने त्यासंदर्भात जास्त बोलण्यास नकार दिला होता.

