Deepika Padukone Reaction on Dhurandhar 2: बॉलीवूडचे पॉवर कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्यात सध्या सर्व काही आलबेल नाही का? अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. निमित्त होते आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे यश. रणवीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींचे विक्रम मोडत असताना दीपिकाने त्यावर साधी पोस्टही शेअर केली नव्हती. इतकेच नाही तर प्रीमियरला न जाता तिने सासू-सासऱ्यांबरोबर एका संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावरून सोशल मीडियावर दीपिकावर टीकेची झोड उठली होती. मात्र, मंगळवारी एका इन्स्टाग्राम रीलवर थेट कमेंट करत दीपिकाने या सर्व चर्चांवर मौन सोडले आहे.
रणवीर सिंहची ‘बँड बाजा बारात’मधील को-स्टार अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली यांनी नुकतंच आदित्य धरच्या ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ या ब्लॉकबस्टर स्पाय थ्रिलर चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी दमदार कमाई केली. पण तरीही रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणने धुरंधरबद्दल काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. अखेर मंगळवारी दीपिका पादुकोणने या सर्व चर्चांवर मौन सोडलं. रणवीर आणि दीपिकाच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक आहे ना? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका इन्स्टाग्राम रीलवर कमेंट करत तिने प्रतिक्रिया दिली.
धुरंधर २ च्या प्रिमियरला न जाता सासू-सासऱ्यांबरोबर गेलेली दीपिका पादुकोण
‘कल्चर सर्कल’ या इन्स्टाग्राम हँडलने २३ मार्च रोजी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. गेल्या महिन्यात ‘धुरंधर २’ प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये असं म्हटलं होतं की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दीपिका मुंबईत ऋषभ रिखीराम शर्मा यांच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला उपस्थित होती, मात्र तिने स्वतःच्या पतीच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला जाणे टाळलं. याच कारणावरून दीपिकावर टीका केली जात होती.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं होतं की, “दीपिका पादुकोणने ५०० कोटी बजेटच्या चित्रपटावर चक्क मौन बाळगंय. एकीकडे ‘धुरंधर २’ जगभरात रेकॉर्ड मोडत असताना, दीपिकाने चित्रपटाच्या प्रीमियरला जाण्याऐवजी सासू-सासऱ्यांबरोबर एका सतार वादनाच्या कॉन्सर्टला जाणं पसंत केलं. ना कोणती पोस्ट, ना कौतुक, फक्त मौन. शांत राहून ती दिग्दर्शकाच्या विरोधात काही संकेत देत आहे की इंटरनेटवर सुरू असलेल्या नाटकापासून स्वतःला दूर ठेवतेय?”
दीपिका पादुकोणने नेमकं काय म्हटलं?
या पोस्टवर दीपिकाने मिश्किलपणे कमेंट केली. “मित्रा, तू म्हणतोयस ते नंतरचं कारण म्हणजेच नाटकापासून स्वतःला दूर ठेवतेय ते बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगते, मी हा चित्रपट तुम्हा सर्वांच्या आधीच पाहिला आहे. आता सांगा, कोणाची फजिती झाली? (तोंड दाबून हसणारा इमोजी).” तिच्या या कमेंटनंतर अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जेएनयू भेटीचे फोटो व राजकीय विचारधारेबद्दल चर्चा
व्हिडीओमध्ये असंही म्हटलं होतं की ‘धुरंधर २’ च्या रेकॉर्ड ब्रेकिंग यशाबद्दल दीपिकाने तिच्या सोशल मीडियावर काहीही शेअर करून जाहीरपणे प्रतिक्रिया दिली नाही. युजर्सनी २०२० मधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनादरम्यानच्या तिच्या भेटीचे जुने संदर्भ शोधून काढले आहेत. अनेकांच्या मते पतीचा हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा वाटत असल्याने, दीपिकाने तिच्या राजकीय भूमिकेमुळे यावर मौन बाळगले असावे, असा आरोपही तिच्यावर या व्हिडीओत करण्यात आला.
व्हिडीओच्या शेवटी अँकरने प्रश्न विचारला, “हे दीपिकाने जाणीवपूर्वक केलंय की इंटरनेटवर सेलिब्रेटींच्या सोशल मीडियावरील शांततेचा खूप जास्त अर्थ काढला जातोय?” अखेर दीपिकाने स्वतः या व्हिडीओवर कमेंट करून प्रतिक्रिया दिली आणि तिचं मत मांडलं. दरम्यान, गेल्या महिन्यात ‘धुरंधर’च्या संपूर्ण टीमचे कौतुक करणाऱ्या दीपिकाच्या सोशल मीडिया पोस्टचे काही खोटे स्क्रीनशॉट्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. हे फोटो काही युजर्सनी बनावट तयार करून व्हायरल केले होते.
