आजी-आजोबांना नातवंडाचं विशेष कौतुक असतं असं अनेकदा पाहायला आणि ऐकायला मिळतं. असंच काहीसा अनुभव सध्या बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे वडील माजी बॅटमिंटन पटू प्रकाश पादूकोण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी रणवीर सिंह आणि दीपिका आई-वडील म्हणून कसे आहेत, ते त्यांच्या लेकीचं संगोपण कशाप्रकारे करत आहेत याबद्दल सांगितलं आहे.
प्रकाश पादुकोण यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लेक दीपिका, जावई रणवीर आणि नात दुआबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या नातीचं कौतुक केलं असून तिला नवीन लोकांमध्ये राहायला खूप आवडतं तसेच ती पटकन सगळ्यांमध्ये मिसळते असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी रणवीरच्या तुलनेत दीपिका अधिक लेकीसाठी मेहनत घेते असं म्हटलं आहे.
दीपिका-रणवीरबद्दल काय म्हणाले प्रकाश पादुकोण?
इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना प्रकाश पादुकोण म्हणाले, “दीपिका लेकीसाठी खूप करते, पण रणवीरसुद्धा त्याला काम नसतं तेव्हा खूप मदत करतो. दोन्ही कुटुंबही नेहमी मदतीसाठी तयार असतात”. यावेळी त्यांनी आजोबा झाल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल आणि लोक नेहमी त्यांच्या नातवंडांचं इतकं कौतुक का करतात असा त्यांना असलेल्या प्रश्नाचं आता उत्तर मिळाल्याचं सांगितलं आहे.
प्रकाश पादुकोण यांनी सांगितलं की, दुआ जेव्हा जेव्हा बंगळुरूमध्ये येते, तेव्हा ते आणि त्यांची पत्नी उज्जला तिला सामान्य आयुष्यातील अनुभव देण्याचा प्रयत्न करतात. अनेक सेलिब्रिटींच्या मुलांना आई-वडिलांच्या लोकप्रियतेमुळे असे अनुभव घेता येत नाहीत. ते पुढे म्हणाले की, दुआला ते मेट्रोची सफर घडवतात, ऑटो-रिक्षामधून फिरायला घेऊन जातात आणि संध्याकाळी स्थानिक लोकल पार्कातही घेऊन जातात, जेणेकरून तिला सर्वसामान्य मुलांप्रमाणे विविध अनुभव घेता येतील.
नातीबद्दल प्रकाश पादुकोण पुढे म्हणाले, “दुआला पॅडल खेळाची खूप आवड आहे. आमच्या घराजवळच एक छान पॅडल कोर्ट आहे. आम्ही कॅम्प स्टेशनजवळ राहतो, त्यामुळे तिला रेल्वेगाड्या पाहायलाही खूप आवडतं. ती खूप आनंदी स्वभावाची मुलगी आहे, त्यामुळे तिला लोकांमध्ये मिसळायला आवडतं. ती जवळपास प्रत्येकालाच ‘हॅलो’ म्हणते. लहानपणापासूनच ती प्रवास करत आली आहे आणि त्याचा तिला खूप फायदा झाला आहे. ती खूप वेगाने मोठी होत आहे आणि सध्या तिच्या आयुष्यातील अतिशय रंजक टप्प्यातून जात आहे.”
काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर यांनी इन्स्टाग्रामवर एकत्र पोस्ट शेअर करत ते दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी त्यांनी शेअर केली. त्यामुळे आता लवकरच दुआनंतर रणवीर आणि दिपाका त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करतील.
