Deepika Padukone Second Pregnancy : दीपिका पादुकोणने नुकतीच एक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे. दीपिका व रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. ४०व्या वर्षी दीपिका दुसऱ्यांदा आई होणार आहे. दीपिकाने भविष्यात आई होण्याबद्दल आणि किती मुलं हवी आहेत याबद्दल पूर्वी एकदा सांगितलं होतं.
दीपिका व रणवीर अनेकदा मनमोकळेपणाने बोलत असतात, व्यक्त होत असतात. एका मुलाखतीत अभिनेत्रीने भविष्यात आई होण्याबद्दलच्या विचाराबद्दल सांगितलेलं तर रणवीरनेही त्याला भविष्यात मुलगीच हवी आहे याबद्दल सांगितलं होतं. अशातच आता या जोडीने ते पुन्हा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची माहिती शेअर केल्यानंतर हे दोघे नेमकं काय म्हणाले होते याबद्दल जाणून घेऊयात…
आई होण्याबद्दल दीपिका काय म्हणालेली?
‘न्यूज १८’च्या माहितीनुसार राजीव मसंदशी संवाद साधताना दीपिका पादुकोणने चित्रपटसृष्टीबाहेरील आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं. ती म्हणालेली, “जर मी अभिनेत्री नसते, तर काय करत असते हे मला माहीत नाही. पण माझ्या आजूबाजूला काही मुलं असती, अशी आशा आहे. तीन लहान मुलं इकडे-तिकडे धावत असतील. त्यांच्याबरोबर मी कामही करत राहिले असते. त्यांना शूटिंगला घेऊन गेले असते. आनंदी कुटुंब असतं आणि त्याच वेळी मी माझं कामही करत राहिले असते.”
दुसरीकडे, रणवीर सिंहने याआधी पालकत्वाबद्दल त्याचं मत व्यक्त केलं होतं. मुलींबद्दल त्याला विशेष प्रेम असल्याचं त्याने सांगितलं होतं. तो म्हणालेला, “मला मुलगीच व्हावी असं वाटतं. मुली खूप गोड आणि प्रेमळ असतात.”
दीपिका व रणवीर आता दुसऱ्यांदा पालक होणार असून त्यांची मुलगी दुआ आता मोठी बहीण होणार आहे. २०२४मध्ये हे जोडी पहिल्यांदा आई-बाबा झाले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. दीपिकाने लेक दुआचा फोटो शेअर करत ती पुन्हा गरोदर असल्याची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली. दीपिकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर इंडस्ट्रीतील अनेकांनी कमेंट करत या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दरम्यान, दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर येत्या काळात अभिनेत्री दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनसह ‘राका’ या बिग बजेट चित्रपटातून झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. यातील तिच्या भूमिकेबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी तिच्या चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे.
