बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिची मुलगी दुआबरोबर वेळ घालवत आहे. ती व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे. दीपिका पादुकोण संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटामध्ये झळकणार होती. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास, अभिनेत्री त्रिशा कृष्णन, कियारा अडवानी यांसारखे कलाकार झळकणार आहेत. पण, नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार ‘स्पिरिट’ या चित्रपटातून दीपिका पादुकोणची एक्झिट झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार संदीप रेड्डी वांगा यांना दीपिकाची काम करण्याची पद्धत कळल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं होतं. कारण- दीपिका दिवसाला केवळ सहा तास काम करणार, असं तिच्या एजन्सीकडून त्यांना सांगण्यात आलं होतं. एवढंच नव्हे, तर १०० दिवसांहून अधिक दिवस चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लागले, तर त्या प्रत्येक दिवसाचे त्यांना तिला पैसे द्यावे, असं लिहिलेलं. या संदर्भातील करारही दीपिकाला करायचा होता. संदीप रेड्डी वांगा यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांशी या संदर्भात चर्चा करून प्रश्न सोडवण्यचा प्रयत्न केला; परंतु त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही.
‘पिंकव्हिला’ने काही दिवसांपूर्वी याबाबत माहिती देत म्हटलं होतं की, दीपिकाच्या गरोदरपणामुळे तिला या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. पण, त्यानंतर संदीप रेडी वांगाने वेळापत्रकात बदल केल्यानंतर ती या चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाले होती. अशातच आता ती या चित्रपटामधून बाहेर पडल्याचं वृत्त समोर आलं आहे.
दरम्यान, १४ नोव्हेंबर २०१८ रोजी दीपिका व रणवीर सिंह यांनी लग्न केलं होतं. लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनी या जोडीने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. पुढे दीपिकाने ८ स्पटेंबर २०२४ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या दीपिका मुलीबरोबर वेळ घालविताना दिसत आहे. तिच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘कल्कि २८९८ ए. डी, ‘ब्रह्मास्त्र भाग २ : देव’ या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्यासह ती ‘स्पिरिट’ या चित्रपटातही झळकणार होती. परंतु, नुकतंच तिनं या चित्रपटातून एक्झिट घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. अद्याप याबाबत तिनं कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.