Deepika Padukone flaunts baby bump: बॉलीवूडच्या लोकप्रिय जोडींपैकी एक असलेले रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. याबाबत त्यांनी एप्रिलमध्ये घोषणा केल्यानंतर आता दीपिका तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. वांद्रे परिसरामध्ये नव्या घराचे काम पाहण्यासाठी ही जोडी आली होती. यावेळी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे एकत्र बाल्कनीमध्ये बोलताना दिसून आले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
मुंबईतील पॉश वांद्रे परिसरातील नवीन घराची पाहणी करताना दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह दिसून आले. त्यांचे एकत्रित फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये रणवीर आणि दीपिका त्यांच्या नव्या घरामध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना दिसून आले आहेत. तसेच दोघेही घराच्या बाल्कनीत काही वेळ घालवताना आणि एकमेकांशी बोलताना बोलत होते. दीपिका-रणवीरच्या या नवीन घराचे बांधकाम आणि इंटिरिअर डिझायनिंगचे काम सुरु आहे. दुसऱ्या बाळाच्या आगमनानंतर हे जोडपे नवीन घरामध्ये राहायला जाण्याची शक्यता आहे.
रणवीर सिंह व दीपिका पादुकोणचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोणच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो स्पष्ट दिसत आहे. तिने एक सैल पांढरा को-ऑर्ड सेट परिधान केला असून रणवीरने कॅज्युअल लाल टी-शर्ट आणि काळी ट्रॅक पँट घातली होती. अनेक फोटोंमध्ये हे जोडपे हसताना, घराचे वेगवेगळे भाग बघताना आणि सुरू असलेल्या कामाची चर्चा करताना दिसून आले.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोणच्या बेबी बंपने लक्ष वेधले आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘हे कपल एकमेकांसह जास्त सुंदर आणि खूश दिसते’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘दीपिकाला कोणाची नजर लागू नये, तिच्या नवीन बाळासाठी आणि नव्या घरासाठी शुभेच्छा.’ तर आणखी एकाने लिहिले आहे की, ‘हे दोघे एकमेकांकडे ज्या नजरेने बघतात, त्यातूनच प्रेम दिसून येते.’
That's my parents ?? pic.twitter.com/qJKluEDWO1
— justagurl❥ (@jviciouslady) June 8, 2026
२०२४ साली दीपिकाने दिला गोंडस मुलीला जन्म
एप्रिल महिन्यामध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंह या जोडप्याने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली होती. २०२४ साली दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. या जोडीने मुलीचे नाव दुआ ठेवले आहे. आता २०२६साली रणवीर-दीपिका नव्या बाळाचे स्वागत करणार आहेत. सोशल मीडियावर याची घोषणा करताना दुआच्या हातामध्ये टेस्टिंग किट देत सर्वांबरोबर गुड न्यूज शेअर केली होती.
