Deepika Padukone Spoke About Motherhood : गेल्या काही वर्षांत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी आई-बाबा झाले. त्यानंतर काही अभिनेत्रींनी मुलांच्या जन्मानंतर अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आणि सध्या त्या त्यांच्या मुलांचं संगोपन करण्यात व्यग्र आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे दीपिका पादुकोण.

दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु, सध्या ती अभिनय क्षेत्रापासून थोडी दूर आहे. अभिनेत्रीनं लकीसाठी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला आहे. अनेकदा मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्री त्यांच्या मुलांना पुरेसा वेळ देता यावा आणि त्यांचं छान संगोपन करता यावं यासाठी करिअरमधून ब्रेक घेतात. परंतु, मुलांची काळजी घेत असताना अनेकदा त्यांना स्वत:साठीहं वेळ मिळत नाही. असंच काहीसं दीपिका पादुकोणबरोबर होत असल्याचं तिने म्हटलं आहे.

दीपिका पादुकोण सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिथे तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. परंतु, लेकीच्या जन्मानंतर अभिनेत्री अनेकदा पालकत्व, मातृत्व अशा प्रकारच्या कंटेंटचे रील आणि मीम्स शेअर करत असते. अशातच आता तिनं इन्स्टाग्रामवर पुन्हा एक रील शेअर केली आहे. त्यामधून तिनं तिची सध्याची मानसिक स्थिती कशी आहे याबद्दलची माहिती दिली आहे. दीपिका नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

दीपिकानं शेअर केलेल्या या रीलमध्ये “माझा एक वाईट गुण असा आहे की, मला माझं बाळ इतकं जास्त आवडतं की, दुसऱ्या कुणी त्याची काळजी घ्यावी हे मला सहन होत नाही… पण मला थोडा आरामही हवा असतो… तरी त्याच्याशिवाय राहण्याची इच्छा नसते… मला २४ तास शांतता हवी असते… पण तरीही मला त्याच्यासोबतच कायम राहायचं असतं,” असं तिनं लिहिलं आहे.

दीपिकानं पूर्वी एका मुलाखतीत तिच्या लेकीच्या जन्मानंतर तिचं आयुष्य कसं बदललं याबद्दल सांगितलं होतं. दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार ती म्हणालेली, “आई झाल्यानंतरचं हे नवीन आयुष्य मी आता हळूहळू समजून घेत आहे. बाळ झालं की, आपण दुसऱ्या एका जीवाची पूर्ण जबाबदारी घेतो. आतापर्यंत माझं आयुष्य माझी स्वप्नं, करिअर आणि मला काय हवं आहे याभोवती फिरत होतं; पण आता अचानक सगळं बदललं आहे. आता माझ्यावर अशा एका छोट्या जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी आहे, जो प्रत्येक गोष्टीसाठी पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे.”

दीपिकानं त्यावेळी, तिची मुलगी तिच्यासाठी सगळ्यात आधी येते आणि अजून तिला व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल कसा साधायचा याचं उत्तर मिळालेलं नाही, असं म्हटलेलं. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती येत्या काळात शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘किंग’ या चित्रपटातून झळकणार आहे.