‘धुरंधर’ हा अॅक्शनपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. त्यामुळे अभिनेता रणवीर सिंह सध्या यशाच्या शिखरावर आहे. रणवीर सिंह सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. त्याच्याबरोबर त्याची पत्नी, अभिनेत्री दीपिका पादुकोणही आहे. रणवीर व दीपिका यांनी प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांची ‘बंगलो’ या रेस्टॉरंटमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान ‘धुरंधर’च्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. इतकंच नाही तर दीपिका विकास खन्नांकडून मोदक बनवायला शिकली. विकास यांनी या भेटीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘धुरंधर’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकने या रीलची सुरुवात होते. पुढे विकास खन्ना रणवीर आणि दीपिकाला मोदक कसा बनवायचा ते सांगतात. नंतर दीपिका स्वतः मोदक बनवण्याचा प्रयत्न करते, तर विकास रणवीरला एक मोदक भरवतात आणि धुरंधरच्या यशाबद्दल त्याचं मिठी मारून अभिनंदन करतात. दुसरीकडे दीपिका एक मोदक विकासला देते. विकास हसतात आणि मग तोच मोदक दीपिकाला परत भरवतात.

“२०२५ चा हा सर्वात चांगला शेवट आहे, भारताच्या सन्मानार्थ एक नवीन सुरुवात. टीम बंगलोला रणवीर आणि दीपिकाचा पहिला मोदक सेलिब्रेट करता आला. आज बंगलोमध्ये येणाऱ्या आमच्या सर्व पाहुण्यांना २०२६ च्या नव्या सुरुवातीसाठी डाळिंब आणि वेलचीचे मोदक खाण्याचा आनंद घेता येईल. जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या ‘धुरंधर’चे यश साजरे करत आहोत,” असं विकास खन्ना यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.

Award Banner

पाहा व्हिडीओ

मागील काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ‘धुरंधर’कडून रणवीर सिंहच्या खूप अपेक्षा होता. हा त्याचा कमबॅक चित्रपटच म्हणायला हवा. धुरंधरमधून रणवीरने मोठं यश मिळवलं आहे, कारण हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे आणि त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.

दुसरीकडे, दीपिका पादुकोण आई झाल्यानंतर रुपेरी पडद्यावर झळकलेली नाही. दोन मोठ्या चित्रपटांमधून बाहेर पडल्यामुळे दीपिका वर्षभर चर्चेत राहिली. तिने संदीप रेड्डी वांगाचा ‘स्पिरिट’ आणि ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाचा सिक्वेलमधून काढता पाय घेतला. हे सिनेमे सोडण्याचं कारण म्हणजे कामाचे तास आहेत. आई झाल्यानंतर दीपिकाने आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी केली आहे.

रणवीर सिंह लवकरच ‘धुरंधर २’मध्ये झळकणार आहे. धुरंधर २ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित होणार आहे. तोही धुरंधरप्रमाणे बॉक्स ऑफिस गाजवेल, अशी अपेक्षा कलाकार व निर्मात्यांना आहे. दुसरीकडे दीपिका ‘किंग’ चित्रपटात शाहरुख खानबरोबर दिसणार आहे आणि ती अल्लू अर्जुनबरोबर ॲटलीच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.