रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण या बॉलीवूडच्या लोकप्रिय जोडप्याने गुरुवारी ( २९ फेब्रुवारी ) इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लवकरच आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं. लग्नाच्या ६ वर्षांनंतर रणवीर-दीपिका येत्या सप्टेंबर महिन्यात घरी बाळाचं स्वागत करणार आहेत. गुडन्यूज दिल्यावर रणवीर-दीपिका मुंबईहून जोडीने अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरला रवाना झाले होते.

रणवीर आणि दीपिका गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडणाऱ्या अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या जोडप्याचं जामनगर विमानतळावर चाहते आणि पापाराझींकडून जंगी स्वागत करण्यात आलं. दीपिकाला पाहताच तिच्या चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली. या भर गर्दीत रणवीर बायकोला सांभाळत असल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरला पोहोचल्या मिसेस उपमुख्यमंत्री, अमृता फडणवीस यांच्या लूकने वेधलं लक्ष

दीपिका गर्भवती असल्याने रणवीरने सगळी गर्दी बाजूला करत बायकोला गाडीत बसवलं. या जोडीला एकत्र पाहून संपूर्ण विमानतळावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत होता. “बधाई हो…” अशा घोषणा देण्यात आल्या. दीपिका-रणवीर लवकरच आई-बाबा होणार असल्याने चाहत्यांनी विमानतळावर पुष्पगुच्छ देत त्यांना केक भरवला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video : उद्धव ठाकरेंसह आदित्य अन् रश्मी ठाकरे पोहोचले जामनगरला, अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी खास उपस्थिती

दीपिका आणि रणवीरच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला काळजी घेण्याचा व पुन्हा अशा गर्दीत जाऊ नये असा सल्ला दिला आहे. दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दीपिका नुकतीच ‘फायटर’ चित्रपटात झळकली होती. तर, रणवीर सध्या संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.