Deepika Padukone on Ranveer Singh: बॉलीवूडमधील ज्या लोकप्रिय जोडप्यांची नावे घेतली जातात, त्यामध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी वरच्या क्रमांकावर येते. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या धाकट्या लेकीचे नाव जाहीर केले, त्यामुळे ते चर्चेत होते. आता मात्र दीपिकाचे रणवीरबद्दलचे एक वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.

“तो खूप शांत…”

दीपिका व रणवीरने कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ती रणवीरबद्दल म्हणालेली, “जी व्यक्ती जगाला माहीत नाही, त्या व्यक्तीच्या मी प्रेमात पडले. जगाला त्याची जी बाजू माहीत नाही, त्याप्रति मी आकर्षित झाले. तो खूप शांत आहे, तो खूप हुशार आहे, तो खूप संवेदनशील आहे. तो रडतो ही गोष्ट मला आवडते. तो सगळ्या गोष्टी मनापासून करतो, ते मला प्रचंड आवडतं.”

रणवीर प्रेक्षकांना त्याच्या अभिनयामुळे माहीत आहे. त्याच्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तो जेव्हा पुरस्कार सोहळे, विविध कार्यक्रमांना हजेरी लावतो, त्यावेळी त्याचा उत्साह सर्वांना वेडावून टाकतो. त्याच्या एनर्जीचं कायम कौतुक होताना दिसतं. मात्र, माणूस म्हणून तो शांत, संवेदनशील, हुशार आहे. त्यामुळे दीपिका त्याच्या प्रेमात पडली, असे ती म्हणाली होती.

किराणा काउन्सलिंग (Kirana Counselling)चे सहसंस्थापक व काउन्सलिंगग सायकोलॉजिस्ट जय अरोरा यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. ते म्हणाले, “पैसा आणि सामाजिक प्रतिष्ठा महत्त्वाची असते. कारण- भौतिकवादी आणि भांडवलशाही जगात या गोष्टींचा थेट संबंध सुखसोईंशी असतो. मात्र, शेवटी माणूस हा भावनिक असतो. पहिल्या भेटीत एखाद्या व्यक्तीची विनोदबुद्धी आणि आत्मविश्वास यांसारख्या गुणांची छाप पडते; पण एखाद्या व्यक्तीबद्दलचं आकर्षण अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी भावना महत्त्वाच्या असतात.”

दीपिका म्हणते की, रणवीर रडतो आणि तो अत्यंत भावनिक आहे, ही गोष्ट तिला खूप आवडते. जय अरोरा यांच्या मते, आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची तयारी हा जोडीदारांमधील भावनिक समजूतदारपणाचा पाया असतो. त्यामुळे जोडीदार एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात, एकमेकांच्या भावना समजून घेतात आणि एकमेकांच्या गरजांना योग्य प्रतिसाद देऊ शकतात.

जय अरोरा यांच्या म्हणण्याप्रमाणे, अशी कपल्स भावना किंवा असुरक्षितता व्यक्त करण्यास घाबरत नाहीत. उलट, कठीण प्रसंगांमध्ये ती एकमेकांना आधार देतात आणि एकमेकांच्या अधिक जवळ येतात. अशी जोडपी कोणत्याही टीकेची किंवा आपल्याबद्दल चुकीचं मत बनवलं जाण्याची भीती न बाळगता, मनातील खऱ्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करू शकतात.