Deepika Padukone praised ICC : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण ही लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. २०२४ मध्ये पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर आता दीपिका व रणवीर सिंह दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. बॉलीवूडच्या यशस्वी व लोकप्रिय अभिनत्रींपैकी एक असलेल्या दीपिकाने शूटिंगच्या तासांबाबत स्पष्ट भूमिका घेतली. प्रोफेशनल व वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखून दीपिका काम करण्यास आग्रही असल्याचे दिसून येते. दरम्यान, आयसीसीने महिला क्रिकेटपटूंसाठी नव्याने जाहीर केलेल्या सूचनांचे दीपिका पादुकोणने कौतुक केले आहे.

दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर सक्रिय असून, ती अपडेट शेअर करीत असते. मंगळवारी दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करीत आयसीसीचे कौतुक केले आहे. आयसीसीने महिला क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये बाळाला जन्म देणाऱ्या महिला खेळाडूंच्या पुनरागमन धोरणामध्ये बदल करून, मातृत्वाचा सन्मान करण्यात आला आहे. प्रसूतीनंतर महिला क्रिकेटपटूंना पुन्हा खेळ खेळता यावा यासाठी आयसीसीने नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याबाबत दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्टोरी शेअर करीत या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक केले.

काय आहे दीपिका पादुकोणची स्टोरी?

महिला क्रिकेटपटूंबाबत इन्स्टाग्रामवर दीपिका पादुकोणने पोस्ट शेअर केली आहे. आयसीसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे हे महिला खेळाडूंच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हणत दीपिकाने या उपक्रमाचे स्वागत केले. ही पोस्ट शेअर करताना तिने, “महिला क्रीडा क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे,” असे लिहीत टाळ्यांच्या इमोजीसह आपला आनंद व्यक्त केला. तसेच तिने आयसीसीलाही टॅग केले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण ही नोकरी करणाऱ्या महिलांचे काम आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य यांच्यात आरोग्यदायी समतोल राखण्यासंदर्भात सातत्याने पुरस्कार करीत आहे. त्यामध्ये आता तिने महिला खेळाडूंसाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दीपिका पादुकोण सोशल मीडिया पोस्ट

दीपिकाची कामांच्या तासांबद्दल स्पष्ट भूमिका

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आठ तासांची कामाची शिफ्ट आणि चित्रपटाच्या नफ्यामधून पैसे मिळण्याची मागणी केली होती. यापूर्वी दीपिकाने कामांच्या तासांबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली. ती म्हणाली होती की, आपल्या समाजात अति-काम करण्याच्या पद्धतीला सामान्य मानले जाऊ लागले आहे आणि अनेकदा ‘बर्नआऊट’ला (अति-कामामुळे येणाऱ्या थकव्याला) कामाप्रति असलेली निष्ठा समजण्याची चूक केली जाते. मानवी शरीर आणि मन या दोघांसाठीही दिवसातून आठ तास काम करणे पुरेसे असते. तसेच, लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असतील, तरच ते आपले सर्वोत्तम योगदान देऊ शकतात, अशी स्पष्ट भूमिका दीपिका पादुकोण हिने घेतली होती.