Deepika Padukone flaunts Baby Bump on daughter Dua’s 2nd Birthday: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण व रणवीर सिंहची लेक दुआ आज ८ सप्टेंबर २०२६ रोजी दोन वर्षांची झाली. दुआच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त रणवीर-दीपिकाने एक खास पोस्ट केली आहे. दीपिका सध्या दुसऱ्यांदा गरोदर आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये दीपिकाने तिचा बेबी बंप फ्लाँट केला आहे.
दीपिका पादुकोण व रणवीर सिंह लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच दीपिकाने दुसऱ्या प्रेग्नेन्सीबद्दल घोषणा केली होती. त्यांची लाडकी लेक दुआ मोठी बहीण होणार आहे. आता दुआच्या दुसऱ्या वाढदिवशी रणवीर व दीपिकाने काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
“दुआ आणि आमची मनं आणखी मोठी होत आहेत! तुमच्या आशीर्वादांबद्दल धन्यवाद!” असं कॅप्शन देत रणवीर सिंहने फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये क्यूट दुआने दोन वेण्या घातल्या आहेत आणि छान पँट व टॉप घातले आहे. तर रणवीरने पांढरे शर्ट व पँट घातली असून दीपिकाने ट्रान्सपरंट लाँग टॉप व मॅचिंग पँट परिधान केली आहे. तिने क्रॉप टॉप घातले आहे, ज्यात तिचा बेबी बंप दिसतोय.
पाहा रणवीर व दीपिकाचे दुआबरोबरचे खास फोटो
रणवीर सिंह व दीपिका पादुकोणची लव्ह स्टोरी
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची पहिली भेट २०१२ मध्ये सिंगापूरमधील ‘झी सिने अवॉर्ड्स’ दरम्यान झाली होती. २०१३ मध्ये आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला: राम-लीला’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यातील जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ‘राम-लीला’नंतर या जोडीने ‘बाजीराव मस्तानी’ (२०१५) आणि ‘पद्मावत’ (२०१८) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
रणवीर सिंह व दीपिका पादुकोणचं लग्न
तब्बल ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये सोशल मीडियावर आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली. १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीतील प्रसिद्ध ‘लेक कोमो’ इथे त्यांचा विवाह सोहळा पार पडला. १४ नोव्हेंबरला दीपिकाच्या दक्षिण भारतीय संस्कृतीनुसार लग्न झाले. तर १५ नोव्हेंबरला रणवीरच्या संस्कृतीनुसार सिंधी पद्धतीने लग्न झाले.
लेक दुआचा जन्म, आता दुसऱ्यांदा गरोदर आहे दीपिका पादुकोण
लग्नानंतर सहा वर्षांनी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दीपिकाने गरोदर असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. ८ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर (१ नोव्हेंबर २०२४) त्यांनी आपल्या मुलीच्या नावाची घोषणा केली. त्यांनी तिचे नाव दुआ पादुकोण सिंह असे ठेवले. त्यानंतर १९ एप्रिल २०२६ रोजी दीपिकाने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं. आता लवकरच रणवीर व दीपिका त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत.
