Deepika Padukone and Ranveer Singh are Expecting Their Second Child : दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांची जोडी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. ‘धुरंधर’च्या दोन्ही भागांच्या यशामुळे सध्या रणवीरचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे, त्यामुळे दीपिका-रणवीरच्या घरात सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. अशातच अभिनेत्रीने आणखी एक गुडन्यूज तिच्या तमाम चाहत्यांना दिली आहे. दीपिका-रणवीर आता दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. प्रेग्नन्सी किटचा फोटो शेअर करत दीपिकाने ही आनंदाची बातमी तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांची लेक दुआची सुद्धा झलक पाहायला मिळत आहे.

दीपिका व रणवीरच्या घरी लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचं आगमन होणार आहे. यांच्या लेकीचं नाव ‘दुआ’ असून तिचा जन्म ८ सप्टेंबर २०२४ रोजी झाला. दुआ एक वर्षांची झाल्यावर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दीपिका-रणवीरने तिचा चेहरा चाहत्यांसमोर रिव्हिल केला होता. गेल्या काही दिवसांपासून दीपिका दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. पण, आता अभिनेत्रीने स्वत: अधिकृत पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज सर्वांना दिली आहे.

दीपिकाने दुआचा गोड फोटो शेअर केलाय आणि तिच्या हातात प्रेग्नन्सी किट असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने ‘evil eye’ इमोजी दिले आहेत. यासह पोस्टमध्ये तिने रणवीरला टॅग सुद्धा केलं आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच संपूर्ण कलाविश्वातून रणवीर-दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे, दीपिका आता ४० वर्षांची आहे.

गेल्या काही दिवसांपासून दीपिकाला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात होतं. ‘धुरंधर २’च्या यशाबद्दल दीपिकाने कोणतीही पोस्ट शेअर केली नसल्याने तिच्याबद्दलच्या अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. इतकंच नव्हे तर रणवीर-दीपिकाच्या नात्यात दुरावा आल्याचंही बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वीच एका रेस्टॉरंटमध्ये जोडीने उपस्थिती लावत रणवीर-दीपिकाने या सगळ्या ट्रोलर्सची बोलती बंद केली होती.

दरम्यान, ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटापासून रणवीर व दीपिकाची लव्हस्टोरी सुरू झाली होती. या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघे ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर व दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. यानंतर २०२४ मध्ये रणवीर-दीपिका आई-बाबा झाले. आता लवकरच त्यांच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन होणार आहे.