बॉलिवूडची मस्तानी अशी ओळख असलेली दीपिका पदुकोण हिचं नाव मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या दीपिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर भरपूर यश मिळवलं आहे. मात्र नुकतंच दीपिकाने तिला झालेल्या मानसिक आजाराबद्दल खुलासा केला आहे. यात तिने या आजाराशी कशाप्रकारे सामना केला याबद्दलही भाष्य केले.
दीपिका पदुकोण ही सध्या अनेक लोकांना मानसिक आरोग्याबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच तिने तामिळनाडूमधील तिरुवल्लूर या ठिकाणी असलेल्या ‘लिव्ह लव्ह लाफ’ मानसिक आरोग्य फाउंडेशनच्या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी एनडीटीव्ही या प्रसारमाध्यमाशी बोलताना दीपिकाने तिच्या मानसिक आजाराबद्दलही खुलासा केला.
आणखी वाचा : लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच अभिनेत्री नयनतारा झाली आई, घरी जुळ्या मुलांचे आगमन
दीपिका पदुकोण काय म्हणाली?
२०१५ मध्ये मी एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. हा आजार काय आहे, याची मला काहीही कल्पना नव्हती. त्यावेळी जर माझ्या आईने माझ्यातली मानसिक आजाराची लक्षणे ओळखली नसती तर आज मी कोणत्या स्थितीत असती याची मलाही कल्पना नाही. मला २०१५ मध्ये मानसिक आजार झाला होता. यावेळी मी नैराश्याशी झुंज देत होती.
माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात. ते मला अनेकदा भेटायला यायचे. मी त्यांच्यासमोर खंबीर असल्याचे दाखवत होती. माझ्या आयुष्यात सर्व काही ठिक आहे, असा भास निर्माण करण्याचा मी प्रयत्न करत होती. पण जेव्हा ते पुन्हा घरी जाण्यासाठी निघायचे तेव्हा मात्र मला फार एकटं असल्याची जाणीव व्हायची. एकदा मला माझ्या आईने अनेक प्रश्न विचारले. माझ्या आयुष्यात एकटेपणा आहे हे तिला क्षणार्धात जाणवले आणि त्यावेळी मला वाटलं की त्या दोघांना देवानेच माझ्याकडे पाठवलंय.
मी मानसिक आजाराशी झुंज देत असताना कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काळजी घेणाऱ्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. यात माझ्या आईचा फार मोठा वाटा आहे. माझी बहीणही याबद्दल फार उत्साही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या मोहिमेचा भाग आहे. मी जेव्हा अशाप्रकारच्या आजार असलेल्या माणसांची काळजी घेणाऱ्यांबद्दल ऐकते तेव्हा मला माझा संघर्ष आठवतो. जर त्यावेळी माझी आई किंवा माझी काळजी घेणाऱ्यांनी माझ्यातील ही लक्षणे ओळखली नसती आणि योग्य ते उपचार घेण्यासाठी मला मदत केली नसती तर आज तितकी सक्रीय नसती. त्यावेळी माझी स्थिती काय असती, याचा विचार न केलेलाच बरा, असे दीपिकाने म्हटले.
आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या पहिल्याच आठवड्यात किरण माने पडणार घराबाहेर? प्रोमो व्हायरल
दरम्यान दीपिका लवकरच शाहरुख खान बरोबर पठाण या चित्रपटात झळकणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याबरोबरच दीपिका ही रणबीर कपूरच्या बह्मास्र या चित्रपटातही झळकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.