दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. दुसऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत असलेल्या या जोडप्याने लेक दुआच्या वाढदिवशी मॅटरनिटी शूटमधील काही खास फोटो शेअर केले. ८ सप्टेंबर रोजी दोघांनी इन्स्टाग्रामवर दुआबरोबरचे काही फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये दीपिकाने बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे.

“दुआ आणि आमची मनं आणखी मोठी होत आहेत! तुमच्या आशीर्वादांबद्दल धन्यवाद,” असं या जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिलं. त्यानंतर अर्जुन रामपाल, नीना गुप्ता, आदित्य धर, वरुण धवन आणि मिनी माथुर यांच्यासह त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला.

दीपिकाने मॅटरनिटी शूटसाठी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत किती?

दीपिकाच्या मॅटरनिटी शूटमधील लूकनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दीपिकाने Deme by Gabriella या ब्रँडचा ‘Kianna Set’ परिधान केला होता. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या आउटफिटची किंमत ४८ हजार ६४३ रुपये आहे. या पांढऱ्या लेसच्या आउटफिटवर नाजूक लेस डिटेलिंग आणि कटवर्क करण्यात आलं होतं. टॉपच्या पुढील बाजूला कट-आउट डिझाइन होतं, जे खालच्या बाजूपर्यंत विस्तारलेलं होतं. त्यामुळे तिचा हा लूक अजून लक्षवेधी ठरला. तिने याखाली त्याच डिझाइनची फ्लोरल लेस पँट परिधान केली होती.

ब्रँडच्या वेबसाइटवर या आउटफिटचं वर्णन करताना, “सणवारांच्या प्रसंगांपासून ते इतर कुठल्याही खास लूकपर्यंत, उठावदार स्टाइल दाखवण्यासाठी हा आउटफिट योग्य आहे,” असं म्हटलं आहे. दीपिकाने या लूकचं स्टायलिंग साधं ठेवलं होतं. तिने केस सैल बीच वेव्ह्जमध्ये ठेवले होते आणि कानातलेही घातले नव्हते. तिने कोणतेही दागिने परिधान केले नव्हते. तर रणवीरने पांढऱ्या शर्टबरोबर पांढरी पँट असे कपडे परिधान केले होते.

मात्र, कुटुंबाबरोबरच्या फोटोंमध्ये दुआनेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या फोटोंमध्ये ती शर्ट आणि पँटमध्ये खूपच गोंडस दिसत होती. तिचेही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.या जोडप्याने १९ एप्रिल रोजी दुसऱ्यांदा पालक होणार असल्याची घोषणा केली होती. दीपिका आणि रणवीरने इन्स्टाग्रामवर पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्टचा फोटो शेअर केला होता. या पोस्टला त्यांनी कोणतंही कॅप्शन दिलं नव्हतं. फक्त नजर लागण्यापासून संरक्षणाचं प्रतीक मानले जाणारे दोन इव्हिल आय इमोजी वापरले होते.