Muzammil Ibrahim on relationship with Deepika Padukone: कलाकारांच्या रिलेशनशिपची अनेकदा चर्चा होत असते. ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेले तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या भूतकाळातील नात्यांबद्दल बोलले जाते. काही वेळा स्वत: कलाकार किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्ती त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसतात. आता दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडने त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले आहे.

एक काळ असा होता की, जेव्हा दीपिका पादुकोण आणि मॉडेल व अभिनेता मुझम्मिल इब्राहिम एकमेकांना डेट करीत होते. मात्र, काही काळानंतर हे दोन्ही कलाकार वेगळे झाले. मुझम्मिल अनेकदा दीपिकाबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना दिसतो. एका मुलाखतीत त्याने दीपिकाबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केले होते. आम्ही वेगळे झालो, त्याचा पश्चात्ताप नाही, असे तो म्हणाला होता. त्याच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“मी नेहमीच माझ्या भूतकाळातील…”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओसंदर्भात आता मुझम्मिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने हे स्पष्ट केले की, सध्या जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ते वर्षभरापूर्वीचे आहेत. ही मुलाखत मी आता दिली आहे, असे जे दावे केले जात आहेत, ते चुकीचे आहेत. मुलाखतीत सविस्तरपणे चर्चा झाली होती. सध्या जे व्हिडीओ समोर येत आहेत, त्यामध्ये एडिटिंग केले गेले आहे.

दीपिकाचे नाव न घेता, मुझम्मिलने लिहिले की भूतकाळातील लोकांबद्दल बोलताना मी कायम आदराने बोलतो. त्याने लिहिले, “मी नेहमीच माझ्या भूतकाळातील व्यक्तींविषयी आदरानं बोलण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजही माझी तीच भूमिका आहे. इतर अनेकांप्रमाणेच मीही अनेक वर्षं माझं काम आणि आयुष्य घडवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे आणि चर्चा त्याच विषयांपुरत्या मर्यादित राहाव्यात, अशी माझी अपेक्षा आहे. मी नेहमीच प्रामाणिकपणे बोलण्यावर विश्वास ठेवतो, तसेच आदरानं माझं मत मांडण्यावरही मी ठाम आहे.”

२०२५ मध्ये मुझम्मिलने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तो म्हणालेला, “दीपिकानं मला प्रपोज केलं होतं. पुढे मीच तिच्याशी असलेलं नातं संपवलं. कोणालाही सोडल्याचा मला कधीच पश्चात्ताप होत नाही. मी खूप कणखर माणूस आहे. त्या काळात मी स्टार होतो; ती नव्हती. ती तेव्हा मॉडेल होती; आज ती सुपरस्टार आहे आणि मला कोणी ओळखतही नाही. मी मात्र तिचा खूप मोठा चाहता आहे.”

दरम्यान, दीपिका बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. लवकरच, ती शाहरुख खानच्या द किंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.