Delhi HC orders Rajpal Yadav to surrender: विनोदी अभिनेता म्हणून राजपाल यादवने बॉलीवूडमध्ये त्याची ओळख निर्माण केली आहे. मात्र, अभिनेता आता त्याच्या कामामुळे नाही तर चेक बाऊन्स केसमुळे चर्चेत आला आहे.
चेक बाऊन्स प्रकरणामुळे राजपाल यादवच्या अडचणीत वाढ
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला तुरुंग अधिकाऱ्यापुढे शरण जाण्याचे आदेश दिले आहेत. चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये पेमेंटबाबत वारंवार दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन करणे अतिशय गंभीर असून, असे वागणे निंदनीय असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा म्हणाल्या की अभिनेत्याला अनेक संधी देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले. सेटलमेंटची रक्कम भरण्याबाबत दिलेल्या सवलतीचे अभिनेत्याने वारंवार उल्लंघन केले. न्यायालयाने असेही सांगितले की सवलत देऊनही अभिनेत्याने पैसे भरले नाहीत.
राजपाल यादवने एकूण २.५ कोटी रुपये भरण्याचे आश्वासन दिले होते.ज्यामध्ये ४० लाख रुपये आणि २. १० कोटींच्या हप्त्यांचा समावेश होता. मात्र, जी वेळ ठरवून दिली होती. त्यामध्ये हे पैसे भरले गेले नाहीत.जानेवारी २०२६ मध्ये त्याला शेवटची संधी दिली होती. मात्र, तरीही राजपाल यादवने ठरलेल्या वेळेत पैसे भरले नाहीत.
कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले की सतत आदेशांचे उल्लंघन केल्यानंतर आता पुन्हा सवलत दिली जाऊ शकत नाही. आता अभिनेत्याला ४ फेब्रुवारीला ४ वाजता शरण जाण्यासाठी वेळ दिला आहे. आता पुढची सुनावणी ५ फेब्रुवारी २०२६ ला होणार आहे. त्यामुळे, आता या सुनावणीमध्ये काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राजपाल यादवच्या कामाबद्दल बोलायचे तर दिल क्या करे, शूल, प्यार तुने क्या किया, चांदनी बार, ये जिंदगी का सफर,एक और एक ग्यारह, मसीहा, वास्तू शास्त्र, हंगामा, पहेली, आग, पार्टनर, चल चला चल, तूफान, अंजान, पोलिसगिरी, वेलकम बॅक अशा अनेक चित्रपटातून अभिनेत्यान प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
याबरोबरच, बेबी जॉन, वनवास, नाम, लव की अरेंज मॅरेज या २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही अभिनेता महत्वाच्या भूमिकेत दिसला होता.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता काही प्रतिक्रिया देणार का, आगामी सुनावणीमध्ये काय निर्णय दिला जाणार, तसेच अभिनेता आगामी काळात कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

