Bhuvan Bam BB Ki Vines Sarojini Nagar Incident : आज ‘बीबी की व्हाईन्स’ फेम भुवन बाम हे नाव घराघरांत पोहोचलं असलं, तरी त्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. कंटेंट क्रिएशनमध्ये करिअर करण्यासाठी त्याला आधी मोठा संघर्ष करावा लागला. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने दिल्लीच्या सरोजिनी नगर मार्केटमधील एक भन्नाट आठवण शेअर केली. चाहत्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी त्याला थेट चोर समजून पकडले होते, पण याच प्रसंगाने त्याच्या पालकांचा दृष्टिकोन कायमचा बदलला.

‘स्टोरीबोर्ड १८ ग्लोबल जेनझी समिट’मध्ये भुवन म्हणाला, “मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं की मला बँकेच्या नोकरीचे फॉर्म भरायचे नाहीत. त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे दोन वर्षांचा वेळ मागितला. मी नक्की काय करतोय हे सुरुवातीला त्यांना फारसं कळत नव्हतं. पण त्याच काळात युट्यूबवर माझ्या ‘बीबी की व्हाईन्स’चे ६ लाख सबस्क्रायबर्स झाले होते.”

भुवनला चाहत्यांचा आला अनुभव

त्याच दरम्यान भुवनच्या आईने त्याला खरेदीसाठी सरोजिनी नगरला नेण्यास सांगितलं. गाडीतून उतरताच शेकडो चाहत्यांनी भुवनला ओळखलं आणि त्याच्याभोवती गर्दी केली. सार्वजनिक ठिकाणी चाहत्यांनी गर्दी करण्याचा भुवनचा हा पहिलाच अनुभव होता आणि हे सगळं पाहून त्याची आईही घाबरली. “आम्ही सरोजिनी नगरला पोहोचलो आणि मी गाडीतून बाहेर पडताच शेकडो लोकांनी मला वेढले. माझी आई घाबरली होती, कारण माझ्यासोबत असा प्रकार आधी कधीच घडला नव्हता,” असं भुवन म्हणाला.

चोर समजून पोलिसांनी पकडलं अन्…

मुलाभोवती एवढी गर्दी जमलेली पाहून त्याची आई गोंधळली. त्यानंतर पोलीस तिथे आले आणि सुरुवातीला त्यांनी भुवनलाच चोर समजल्याने परिस्थिती अधिक बिघडली. “माझे लांब केस होते आणि मी डोक्यावर रुमाल बांधायचो. कदाचित त्या लुकमुळे त्यांचा अधिक गोंधळ झाला असावा,” असं भुवन म्हणाला.

इतक्यात तिथे पोलीस पोहोचले. भुवनचे लांब केस आणि डोक्यावर बांधलेला रुमाल पाहून पोलिसांनी त्यालाच चोर समजलं. भुवन म्हणाला, “पोलीस थेट आले आणि त्यांनी माझी कॉलर धरून बाजूला नेले. ‘कोणाचा खिसा कापलास?’ असा सवाल त्यांनी केला. मी त्यांना सांगत होतो की मी चोर नाही, युट्यूबर आहे. अखेर त्यांना माझे व्हिडीओ दाखवल्यावर आणि बाहेर चाहत्यांची घोषणाबाजी ऐकल्यावर त्यांची चूक लक्षात आली.”

आईच्या चेहऱ्यावरचे हसू आणि करिअरला हिरवा कंदील

पोलिसांनी त्याला घरी जाण्यास सांगितलं. गाडीतून परतताना भुवननं पाहिले की, एवढा सगळा गोंधळ होऊनही त्याच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि हसू होतं. मुलाची हीच क्रेझ पाहून अखेर पालकांनी त्याच्या करिअरला पूर्ण पाठिंबा दिला.

दरम्यान, भुवन बाम लवकरच ‘द रिव्होल्यूशनरीज’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. निखिल अडवाणी निर्मित आणि दिग्दर्शित ही मालिका भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये भुवनबरोबर रोहित सराफ, प्रतिभा रांटा आणि गुरफतेह पिरजादा प्रमुख भूमिकेत आहेत. तर जेसन शाह, पाओली दम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरिज ११ सप्टेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.