अभिनेत्री अर्चन पूरन सिंह व अभिनेते परमीत सेठी यांच्या लग्नाची गोष्ट भन्नाट आहे. अर्चना घटस्फोटित होती. ती व परमीत सेठी नंतर प्रेमात पडले. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर कुणालाच न सांगता लग्न केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे लग्न ४ वर्षे त्यांनी लपवून ठेवलं होतं. दोघांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता, पण नंतर त्यांनी हे नातं स्वीकारलं. आता ३८ वर्षांपासून दोघे एकत्र आहेत. या ३८ वर्षांपासून आणखी एक गोष्ट बदललेली नाही. ती कोणती, ते जाणून घेऊयात.

अर्चना व परमीत १९८८ साली भेटले. ४ वर्षे डेट केल्यावर त्यांनी १९९२ साली गुपचूप लग्न केले. नंतरची ४ वर्षे त्यांनी लग्न लपवून ठेवलं. ८ वर्षे अर्चना व परमीत एकमेकांच्या आई-वडिलांना ‘अंकल’ व ‘आंटी’ म्हणायचे. “ती सवय झाल्याने आजही आम्ही त्यांना ‘अंकल’ व ‘आंटी’ म्हणतो. तोही माझ्या आई-वडिलांना ‘अंकल’ व ‘आंटी’ म्हणतो,” असं अर्चना पूरन सिंह म्हणाली.

कोणाला काहीच अडचण नाही – अर्चना

त्याकाळी लग्न झाल्यानंतर अभिनेत्रींचं करिअर संपायचं, त्यामुळे लग्नाबद्दल कुणालाच कळू द्यायचं नव्हतं, असं अर्चनाने सांगितलं. “आमच्या लग्नाबद्दल कुणालाच कळू द्यायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या आई-वडिलांना अंकल व आंटी म्हणत होतो. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही त्यांना अंकल व आंटी म्हणतो. आणि सगळे खूश आहेत, त्यांच्यापैकी कोणालाही आम्ही त्यांना हाक मारतो त्या नावाची अडचण नाही.” अर्चनाच्या वडिलांचं १९९५ साली निधन झालं. तर परमीत सेठीच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं.

लग्नानंतर सासू-सासऱ्यांना अंकल किंवा आंटी म्हणणारे बरेच कलाकार आहेत. अजय देवगणची पत्नी काजोल सासूला आंटी म्हणते. तिने स्वतः याबद्दल सांगितलं होतं. “आंटीला आई म्हणून हाक मारायची? का? मला आई आहे, असं मी म्हणायचे. अजयच्या आईला मी आंटी म्हणते, याची काहीच अडचण नव्हती. त्यांनी कधी मला आई म्हण असं म्हटलं नाही,” असं काजोलने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

काजोलने सासूच्या मैत्रिणींचा एक किस्सा सांगितला होता. “आम्ही सगळे छान एकत्र बसून गप्पा मारायचो. माझ्या सासूच्या मैत्रिणी घरी यायच्या. त्या माझ्या सासूला म्हणायच्या, ती तुला आई म्हणत नाही ना? त्यावर माझ्या सासू म्हणाल्या, ‘ती आई म्हणेल तेव्हा ती मनापासून म्हणेल. सगळे म्हणतात म्हणून नाही.’ मैत्रिणींसमोर त्यांनी माझई बाजू घेतली होती. हे मला फार आवडलं होतं. त्यांनी मला रुळायला वेळ दिला. समजून घेतलं. त्यासाठी मी त्यांचा खूप आदर करते,” असं काजोलने सासूबद्दल म्हटलं होतं.