दिवगंत अभिनेते देव आनंद हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते होते. ‘अमीर गरीब’, ‘बनारसी बापू’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘हम दोनो’ असे एक सो एक हिट चित्रपट देऊन त्यांनी बॉलीवूडमध्ये नाव कमावलं. त्यांचे जगभरात लाखो चाहते होते. त्यांनी तरुणींना अक्षरश: वेडं करून सोडलं होतं. आता देव आनंद यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. देव आनंद यांचा जुहूतील बंगला एका रिअल इस्टेट कंपनीला विकण्यात आला आहे. आता हा बंगला लवकरच तोडला जाणार असून, त्या जागी मोठी इमारत बांधण्यात येणार आहे.
देव आनंद यांनी १९५० मध्ये जुहूमध्ये हा बंगला बांधला होता. त्यावेळी इथे फारशी गर्दी नव्हती. २०११ साली जेव्हा देव आनंद यांचं निधन झालं तेव्हापासून हे घर रिकामं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार देव आनंद यांचा मुलगा सुनील अमेरिकेत स्थायिक झाला आहे; तर त्यांच्या पत्नी कल्पना मुलगी देवीनाबरोबर उटी येथे राहतात.
मिळालेल्या माहितीनुसार- देव आनंद यांचा हा बंगला एका रिअल इस्टेट कंपनीला ४०० कोटींना विकण्यात आला आहे. हा बंगला ज्या भागात आहे, त्याच भागात अनेक कलाकारांचे बंगले आहेत. देव आनंद यांचा बंगला तोडून, त्या जागी २२ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. देव आनंद पत्नी आणि मुलांबरोबर ४० वर्षे या बंगल्यात राहत होते.
देव आनंद यांच्या निधनानंतर या बंगल्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हतं. त्यामुळेच हा बंगला विकला गेल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, देव आनंद यांच्या कुटुंबीयांनी पनवेलमधील काही जागाही विकल्या आहेत. मिळालेली रक्कम तीन जणांमध्ये वाटण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका जुन्या मुलाखतीत देव आनंद यांनी हा बंगला घेण्यामागचं कारण सांगितलं होतं. ते म्हणाले होते, “१९५० मध्ये मी हा बंगला बांधला. त्यावेळी जुहू एक छोटंसं गाव होतं. आजूबाजूला फक्त झाडी होती. मला तिथला एकांत आवडलेला; पण आता जुहू खूप गजबजलेलं आहे. जुहूचा समुद्रकिनाराही पूर्वीसारखा राहिलेला नाही.”
दरम्यान, ३ डिसेंबर २०११ रोजी देव आनंद यांनी लंडनमध्ये ते ८८ वर्षांचे असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. देव आनंद यांनी शेवटच्या क्षणापर्यंत काम करणं सोडलं नाही. देव आनंद दिग्दर्शित ‘चार्जशीट’ चित्रपट ३० सप्टेंबर २०११ रोजी प्रदर्शित झाला होता.