Pakistani Actress on Dev Anand: देव आनंद हे त्यांच्या काळातील लोकप्रिय अभिनेते होते. प्रेम पुजारी, गाईड, नौ दो ग्यारह, काला पानी, हिरा पन्ना, हरे रामा हरे कृष्णा, टॅक्सी ड्रायव्हर असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. आजही त्यांच्या भूमिका अन् चित्रपटांबद्दल बोलले जाते.
देव आनंद यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. एका पाकिस्तानी अभिनेत्रीने देव आनंद यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा झाली.
बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्री भारतात आली होती. तिची भेट देव आनंद यांच्याबरोबर झाली. त्यानंतर तिने देव आनंद यांच्याबरोबर १९९३ ला प्यार का तराना या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
पहिल्या चित्रपटानंतर अभिनेत्रीच्या करिअरमध्ये चढ- उतार आले. त्यानंतर पुन्हा तिने देव आनंद यांच्या गँगस्टर या चित्रपटातून पुनरागमन केले. हा चित्रपट १९९५ ला प्रदर्शित झाला होता. आता ही अभिनेत्री कोण आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ही अभिनेत्री म्हणजे अनता अयूब होय.
“एकाच इमारतीत ते तिसऱ्या मजल्यावर…”
अनिता अयूब यांनी ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये देव आनंद हे प्रमुख भूमिकेत होते.
आता सोशल मीडियावर अनिता अयूब यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘लेहरें’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देव आनंद यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यांना देव आनंद यांच्याबरोबर कसे नाते होते, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, “त्यांच्याबरोबर माझी अनेक नाती तयार झाली होती. एक मोठा भाऊ, एक वडील, एक प्रियकर, एक आई अशा सगळ्या भूमिका ते निभावत होते.”
त्या असेही म्हणाल्या, “डेन्मार्कमध्ये चार आठवडे आम्ही बरोबर राहिलो. एकाच इमारतीत ते तिसऱ्या मजल्यावर होते आणि मी दुसऱ्या मजल्यावर राहत असे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने एकमेकांबरोबर राहता. दररोज सकाळी एकमेकांना पाहता, संपूर्ण दिवस एकत्र घालवता तेव्हा तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीबद्दल सगळे काही माहीत असते. मला त्यांना प्रियकर, आई-वडील, भाऊ अशा सगळ्या रूपांत स्वीकारण्यात कोणतीही अडचण नव्हती.
देव आनंद यांच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांनी ११० चित्रपटांमध्ये काम केले. ६० वर्षांत त्यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही, तर एक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. दरम्यान, देव आनंद यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.
