Dev Anand Nawaz Sharif lahore Operation Safed Sagar: दिग्गज अभिनेते देव आनंद यांनी बॉलीवूडचा एक काळ गाजवला आहे. त्यांनी त्यांच्या खास शैलीतील अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अगदी शेजारच्या पाकिस्तानमध्येही देव आनंद यांचा मोठा चाहतावर्ग होता. अगदी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हेदेखील देव आनंद यांचे चाहते होते. कारगिल युद्धापूर्वी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये देव आनंददेखील सहभागी झाले होते. या भेटीच्या आठवणी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सवरील ‘ऑपरेशन सफेद सागर’ सीरिजमध्ये दाखविण्यात आल्या आहेत.

‘ऑपरेशन सफेद सागर’ या सीरिजमध्ये १९९९ साली झालेले कारगिल युद्ध आणि या युद्धापूर्वीचे प्रसंग दाखविण्यात आले आहेत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत यासाठी दिल्लीहून लाहोरपर्यंत विशेष बसने प्रवास केला होता. या ऐतिहासिक प्रवासामध्ये देव आनंददेखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या आग्रहामुळे देव आनंदही त्या भेटीमध्ये सहभागी झाले होते. या भेटीचा उल्लेख सीरिजमध्येसुद्धा करण्यात आला आहे.

देव आनंद यांचे पाकिस्तानशी काय होते कनेक्शन?

देव आनंद यांचा जन्म लाहोरजवळ झाला असून, त्यांनी लाहोरमधील गव्हर्न्मेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते. फाळणीपूर्वीच ते मुंबईत आल्यानंतर त्यांना पुन्हा कधीच त्यांच्या गावी जाता आले नाही. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर या शिष्टमंडळामध्ये सामील झाल्यानंतर देव आनंद पहिल्यांदाच त्यांच्या मूळ गावी गेले. त्यांनी लाहोर किल्ला आणि आपल्या जुन्या कॉलेजलाही भेट दिली होती.

दोन्ही देशांना एकत्र आणण्यासाठी आलोय – देव आनंद

वाघा बॉर्डरवर अटलबिहारी वाजपेयी, देव आनंद आणि नवाज शरीफ यांची भेट झाली. त्याची आठवण सांगताना नवाज शरीफ म्हणाले होते, “बस वाघा येथे पोहोचताच देवसाहेब बसमधून खाली उतरले आणि आम्ही एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर त्यांनी माझा आणि वाजपेयीजींचा हात हातात घेतला आणि आम्हाला जवळ आणत ते म्हणाले, ‘मी दोन्ही देशांना अशाच प्रकारे एकत्र आणण्यासाठी आलोय.’” त्यानंतर देव आनंद यांनी, “मी माझ्या शहरात आलो आहे. मला इथे एक चित्रपट बनवायचा आहे,” अशी इच्छाही व्यक्त केली होती. देव आनंद यांच्या चित्रपटांचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ मोठे चाहते होते. त्यांना ‘सीआयडी’ चित्रपटातील ‘लेके पहला पहला प्यार’ हे गाणं खूप आवडत होतं.

देव आनंद व नवाज शरीफ यांची शेवटची भेट राहिली अपूर्ण

अभिनेते देव आनंद लंडनला गेले की, नवाज शरीफ यांचीही भेट घेत असत. नवाज शरीफ यांनी सांगितलं होतं की, देव आनंद त्यांची विचारपूस करत असत आणि त्यांच्या लंडनमध्ये एकत्र फिरण्याच्या आठवणीही आहेत. देव आनंद यांचे २०११ मध्ये वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यावेळी नवाज शरीफ यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. नवाज शरीफ म्हणालेले, “देव आनंद मला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये येणार होते. ते म्हणाले, ‘नवाज, मी तुला भेटण्यासाठी पाकिस्तानला येईन.’ मात्र, ही भेट पुन्हा होऊ शकली नाही.”