Dev Anand Suraiya Love Story: हिंदी सिनेमासृष्टीतील सदाबहार अभिनेते देव आनंद आणि सुरैया यांच्यातील अतूट प्रेम आणि त्यांच्या अधुऱ्या राहिलेल्या प्रेमकहाणीविषयी सर्वांनाच माहिती आहे. आजीच्या विरोधामुळे आणि धर्माच्या भिंतींमुळे सुरैया यांनी लग्नाला नकार दिला, ज्यामुळे देव आनंद यांचे हृदय तुटले होते. ब्रेकअपनंतर दोघांनीही एकमेकांकडे कधी पाहिलेही नव्हते. मात्र, कित्येक दशकांनंतर जेव्हा सुरैया अचानक देव आनंद यांच्या पाठीमागे येऊन उभ्या राहिल्या, तेव्हा काय घडलं? देव आनंद यांचे सेक्रेटरी अशोक सिन्हा यांनी या सुन्न करणाऱ्या आणि अत्यंत भावूक प्रसंगाचा खुलासा केला आहे.
दोघांचं नातं प्रचंड कटुतेत संपलं होतं. ब्रेकअपनंतर त्यांनी कधीही एकमेकांना पाहिलंसुद्धा नाही. देव आनंद यांनी लग्न केलं, तर सुरैया मात्र आयुष्यभर अविवाहित राहिल्या. अनेक दशकांनंतर जेव्हा एका कार्यक्रमात देव आनंद आणि सुरैया समोरासमोर आले, तेव्हा काय घडलं होतं, ते त्यांचे सेक्रेटचरी अशोक सिन्हा यांनी सांगितलं.
देव आनंद यांनी भेटण्यास नकार दिला
विकी लालवानीशी बोलताना अशोक सिन्हा म्हणाले, फिल्मसिटीमधील एका कार्यक्रमात सुरैयाला तुम्हाला भेटायचंय, असं देव आनंद यांना सांगण्यात आलं. हा एक नाजूक विषय असल्याने अशोक यांनी देव आनंद यांना याबद्दल विचारलं. पण देव आनंद यांनी भेटण्यास स्पष्ट नकार दिला. ते खूप अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी लगेचच त्या कार्यक्रमातून जायचं ठरवलं.
दुसऱ्यांदा असाच प्रकार एका पुरस्कार सोहळ्यात घडला होता. पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी देव आनंद यांना सांगितलं की, त्यांना लता मंगेशकर यांना पुरस्कार प्रदान करायचा आहे. देव आनंद सहसा अशा पुरस्कार सोहळ्यांना जात नसत, पण लताजींशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी होकार दिला.

देव आनंद यांना सुरैयाला पाहून धक्का बसला
पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी निवेदन करत होते. देव आनंद आणि अशोक मंचावर जाण्यासाठी तयार होते. तेव्हा आयोजकांनी सांगितलं की त्यांना सुरैयाबरोबर लताजींना हा पुरस्कार द्यायचा आहे. हे ऐकून देव आनंद धक्काच बसला. “हे आधी ठरलं नव्हतं,” असं ते म्हणाले. तसेच ही फसवणूक असल्याचं सांगून त्यांनी मंचावर जाण्यास नकार दिला.
देव आनंद यांनी सुरैया यांच्या गालाला स्पर्श केला अन्…
हे सगळं सुरू असतानाच सुरैया तिथे आल्या आणि देव आनंद यांच्या अगदी मागे येऊन उभ्या राहिल्या. ब्रेकअपनंतर कित्येक दशकांनी दोघे पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले होते. देव आनंद यांनी मागे वळून पाहिलं आणि दोघेही एकमेकांकडे पाहतच राहिले. त्या क्षणाची आठवण सांगताना अशोक म्हणाले, “मी त्या क्षणी सुरैया यांच्या चेहऱ्यावर पाहिलेले हावभाव कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. देव आनंद यांच्या चेहऱ्यावरही तसेच हावभाव होते. दोघेही काही वेळ शांत उभे होते. त्यानंतर देव आनंद यांनी हळुवारपणे सुरैया यांच्या गालाला स्पर्श केला आणि ‘सुरैया…’ एवढंच म्हणाले.”
अशोक यांनी अमीन सयानी यांना स्पष्ट सांगितलं की, देव आनंद आणि सुरैया हातात हात घालून मंचावर जाणार नाही. देव आनंद यांनीही यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार नसल्याचं सांगितलं. सुरैया आणि लताजी यांनी देव आनंद यांची मनस्थिती समजून घेतली. त्यानंतर सुरैया एकट्याच मंचावर गेल्या आणि त्यांनी लताजींना पुरस्कार दिला. दुसरीकडे, देव आनंद मागच्या दरवाजाने शांतपणे निघून गेले. “त्यानंतर जेव्हा मी त्यांना त्यांच्या घरी पाहिलं, तेव्हा त्यांची अवस्था खूप वाईट होती,” असं अशोक यांनी सांगितलं.
दुसऱ्या दिवशी आयोजक फुलांचा गुच्छ घेऊन देव आनंद यांची माफी मागण्यासाठी त्यांच्या घरी आले. तोपर्यंत देव आनंद शांत झाले होते आणि त्यांनी आयोजकांना माफ केलं होतं.
देव आनंद आणि सुरैया यांची लव्ह स्टोरी
आपल्या ‘रोमांसिंग विथ लाईफ’ या आत्मचरित्रात देव आनंद यांनी सुरैयाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांचं सुरैयावर खूप प्रेम होतं आणि ते दररोज एकमेकांना भेटायचे. पण सुरैया यांच्या आजीमुळे या नात्यात अडचणी आले. एका हिंदू मुलाने त्यांच्या मुस्लीम नातीशी लग्न करणं आजीला मान्य नव्हतं. त्यामुळे देव आनंद यांनी त्यांच्या घरी येणं-जाणं बंद केलं.
सुरैयाची आजी घ्यायची सगळे निर्णय
“सुरैयाच्या आयुष्याचे सगळे निर्णय फक्त तिची आजी घ्यायची,” असं देव आनंद यांनी लिहिलं होतं. देव आनंद यांनी सुरैया यांच्यासाठी अंगठी पाठवली होती, ती त्यांनी स्वीकारली खरी, पण कौटुंबिक दबावामुळे लग्नाला नकार दिला होता. “त्यावेळी माझं हृदय तुटलं, जणू माझं जग उद्ध्वस्त झालं. तिच्याशिवाय जगण्याला काहीच अर्थ उरला नव्हता,” असं त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं होतं.
देव आनंद यांनी कल्पना कार्तिक यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना सुनील आनंद आणि देविना आनंद ही दोन अपत्ये होती. देव आनंद यांचं डिसेंबर २०११ मध्ये ८८ व्या वर्षी निधन झालं. तर त्यांच्या मुलाचे २६ जुलै २०२६ रोजी निधन झाले.
