Vijay Anand Marriage: ‘गाइड’, ‘तीसरी मंजिल’, ‘ज्वेल थीफ’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक विजय आनंद यांची गणना हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांमध्ये केली जाते. मात्र, त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. १९७८ मध्ये त्यांनी भाची सुषमाबरोबर लग्न केलं होतं. या लग्नाला त्यांच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता. मात्र, कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी ओशो अर्थात भगवान रजनीश यांच्या सल्ल्यानुसार सुषमाशी लग्न केले.
विजय आनंद हे अभिनेते देव आनंद यांचे लहान भाऊ होते. त्यांना अजून एक मोठा भाऊ होता. त्यांचे नाव चेतन आनंद असे आहे. २००४ मध्ये विजय आनंद यांचे निधन झाले. ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी पत्नी सुषमा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. १९७८ मध्ये ‘राम बलराम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनी लग्न केले.
“आम्ही एकमेकांची इतकी काळजी घ्यायचो…”
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सुषमा म्हणालेल्या, “आम्ही एकमेकांची इतकी काळजी घ्यायचो की आम्ही लग्न केले पाहिजे असे वाटू लागले. त्याला माझा साधेपणा आवडायचा. मला त्याचा स्वभाव समजत होता. तो क्वचितच रागवायचा. मात्र, मला खूप पटकन राग येत असे. मी थोडी वेडी होते, त्याला त्रास देण्यासाठी मी मुद्दाम काही ना काही करायचे.”
त्या त्यांच्या नात्याबद्दल असेही म्हणाल्या, “कधी तो माझी समजूत काढायचा, तर कधी मी त्याची समजूत काढायचे. अनेक महिला त्याच्यावर भाळायच्या, पण माझ्या मनात कधीही मत्सर निर्माण झाला नाही. उलट मी त्याला चिडवायचे, त्याला म्हणायचे की मी सगळं पाहतेय मजा कर.”
१९७०च्या दशकात विजय आनंद ओशोंचे अनुयायी झाले होते. कुटुंबाचा या लग्नाला पूर्णपणे विरोध असतानाही ओशोंनीच विजय यांना सुषमाशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. सुषमा त्यांची भाची असल्याने त्यांच्या नात्याला कुटुंबाकडून विरोध होत होता.
२०२२ मध्ये ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा मुलगा वैभव आनंद यांनीही आई-वडिलांच्या आयुष्यातील हा प्रसंग सांगितला होता. ते म्हणाले होते की, “त्या काळात माझ्या वडिलांच्या आयुष्यात काही समस्या होत्या. त्यांना माझ्या आईशी लग्न करायचे होते. रजनीश यांनी त्यांना आईबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काही प्रमाणात स्थैर्य आले.”
विजय आनंद यांचे मोठे भाऊ आणि अभिनेते देव आनंद यांना या लग्नाचा मोठा धक्का बसला होता. ते या नात्यामुळे आनंदी नव्हते. देव आनंद यांचे सचिव अशोक सिन्हा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं नव्हतं, पण देव आनंद यांना हे लग्न आवडलं नव्हतं, ते या नात्यामुळे खूप नाराज होते, असे ते म्हणाले होते.
