Devdas Actor Vijay Crishna Died At 81 : ‘देवदास’ हा शाहरुख खानच्या हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. दमदार कास्ट असलेल्या या चित्रपटातील कथेनंही अनेकांचं लक्ष वेधलेलं. त्यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यापैकीच एक म्हणजे विजय कृष्णा (Vijay Crishna). आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारे विजय कृष्णा यांच्याबद्दल दु:खद बातमी समोर आली आहे. विजय यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

विजय यांनी माध्यमांच्या वृत्तानुसार वयाच्या ८१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. रंगभूमी कलाकार लिलेट दुबे (Lillete Dubey) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. विजय कृष्णा यांचे फोटो शेअर करत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते या पोस्टमधून म्हणाले, “धक्कादायक. आमचे प्रिय विजय कृष्णा, जे गेली २५ वर्षं रंगभूमीच्या कुटुंबाचा भाग होते. त्यांचं दुख:द निधन झालं आहे. ते एक उत्तम अभिनेते होते. दिसायला देखणे, सर्वांची मनं जिंकणारे आणि हुशार होते. त्यांच्या विनोदी शैलीनं अनेकांना आपलंसं करायचे. त्यामुळे त्यांना खूप प्रेम मिळालं.”

अनुपम खेर यांनी व्यक्त केलं दु:ख

विजय कृष्णा यांच्याबद्दल लिलेट दुबे पुढे म्हणाले, “त्यांच्या कितीतरी आठवणी माझ्या डोळ्यांसमोरून गेल्या आणि माझं मन अचानक भरून आलं. तुम्हाला आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या पत्नी, मुलींना प्रेम आणि आशीर्वाद.” या पोस्टखाली बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा कमेंट करत दु:ख व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी “खूप वाईट झालं. ओम शांती” अशी कमेंट केली आहे.

मोठ्या पडद्यावर काम करण्यापूर्वी विजय कृष्णा यांनी रंगभूमीवर अनेक वर्षं काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ते त्यांच्या अभिनय आणि विविध भूमिका यांसाठी ओळखले जायचे. रंगभूमीवर त्यांचं मोठं नाव होतं. ते नावाजलेल्या कलाकारांपैकी एक होते. ‘डान्स लाइक अ मॅन’ हा त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा एक इंग्रजी चित्रपट असून, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं याला नामांकनही मिळालेलं.

विजय कृष्णा यांनी रंगभूमीपलीकडे जाऊन चित्रपटांतही काम केलं आहे. त्यांनी अनेक चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘देवदास’. शाहरुख खानच्या ‘देवदास’ या चित्रपटात त्यांनी त्याच्या वडिलांची नारायण ही भूमिका साकारली होती. संजय लीला भन्साळींनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातील त्यांच्या या भूमिकेसाठीसुद्धा त्यांना अनेक जण ओळखतात. त्यासह त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारीश’मध्येही ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशनसह काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी ‘गांधी’ आणि ‘पीके’सारख्या चित्रपटांतही काम केलं.