Dhadak 2 Director Criticizes Dhurandhar : गेल्यावर्षी रिलीज झालेल्या रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ सिनेमाची सर्वत्र बरीच चर्चा झाली. बॉक्स ऑफिसवर तर या सिनेमाने कमाईचे सगळेच रेकॉर्ड्स मोडले. ‘धुरंधर’च्या रिलीजपासूनच सिनेमाविषयी सकारात्मक आणि नकारात्मक पद्धतीच्या चर्चा झाल्या. अशातच आता एका दिग्दर्शिकेनं नाव न घेता टीका केली आहे.

गेल्या वर्षी ‘धडक २’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या शाझिया इक्बालने आदित्य धरच्या ‘धुरंधर’वर टीका केली आहे. चित्रपटाबद्दलची एक पोस्ट शेअर करीत तिनं तिचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत आणि चित्रपटाचं नाव थेट न घेता शाझियाने लिहिलंय, “किती भयानक चित्रपट आहे हा… द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणं हाच या चित्रपटाचा उद्देश आहे आणि हे मुद्दाम केलं गेलं आहे. काहीही लपवलेलं नाही. पण हो… उत्तम पार्श्वसंगीताचा वापर करून हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या ‘चांगल्या पद्धतीने बनवलेला’ आहे. अभिनंदन इंडस्ट्रीतील मित्रांनो. अल्पसंख्याकांविषयी इतकी उदासीनता आहे की, ती लपवण्याचीही गरज वाटत नाही. याचंच वाईट वाटतं.”

ranveer singh dhurandhar
शाझिया इक्बाल पोस्ट स्क्रीनशॉट

‘धुरंधर’वर दिग्दर्शिकेची अप्रत्यक्ष टीका

‘धुरंधर’ या चित्रपपटाचं दिग्दर्शिकेने नाव घेतलेलं नाही. पण इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने ‘धुरंधर’च्या गाण्यांचा वापर केला आहे. शिवाय तिने एका इन्स्टाग्राम मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला. त्यात असं लिहिलंय, “लोक ‘धडक २’ आणि ‘धुरंधर’ या दोन चित्रपटांचा एकत्र उल्लेख कसा काय करतात? लोकांना स्किझोफ्रेनिया झाला आहे का?” या मेसेजमधील उल्लेखामुळे शाझियाच्या पोस्ट्सचा रोख ‘धुरंधर’कडेच असल्याचं स्पष्ट होतंय.

director shazia iqbal post
शाझिया इक्बाल इन्स्टाग्राम पोस्ट

आदित्य धरच्या ‘धुरंधर’बद्दल थोडक्यात

‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंहसह अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे कलाकार आहेत. चित्रपटाने भारतात सुमारे ८९० कोटी रुपये, तर जागतिक स्तरावर १४०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे तो जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी चौथ्या क्रमांकावर आहे.

शाझियाच्या ‘धडक २’बद्दल थोडक्यात

‘धडक २’ हा शाझियाने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘धडक २’मध्ये सिद्धांत चतुर्वेदी (दलित तरुण) आणि तृप्ती डिमरी (उच्चवर्णीय तरुणी) यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमाने केवळ २२.४५ कोटी रुपयांची कमाई केली.