पडद्यावर जरी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांची ओळख ‘ही-मॅन’ अशी असली, तरी त्यांना त्यांच्या काळातील सर्वात रोमँटिक अभिनेत्यांपैकी एक मानलं जायचं. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी आणि लग्नानंतरही त्यांच नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. एकदा असंच त्यांचं नाव ८०च्या दशकातील एका लोकप्रिय अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. ही अभिनेत्री आता चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर आहे.

हिंदुस्तनाच्या वृत्तानुसार बॉलीवूडपासून बराच काळ दूर राहिलेल्या ज्या अभिनेत्रीचा आपण उल्लेख करत आहोत, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून लोकप्रिय अभिनेत्री अनीता राज आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९८०च्या दशकात अनीता राज आणि धर्मेंद्र ‘नौकर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकत्र आले होते. त्यावेळी दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी चर्चेत होती, तितकीच त्यांच्या ऑफस्क्रीन रोमान्सचीही बॉलिवूडमध्ये चर्चा रंगू लागली होती.

हेमा मालिनी यांनी नवऱ्याला दिलेला ताकीद

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, अनीता राज आणि धर्मेंद्र यांनी ‘नौकर’, ‘करिश्मा कुदरत का आणि जलजला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. असं म्हटलं जातं की, धर्मेंद्र यांच्या शिफारसीमुळेच अनीता यांना त्यांच्याबरोबर बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, दोघांच्या अफेअरच्या चर्चा बॉलीवूडमध्ये रंगू लागल्यानंतर हेमा मालिनी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. माध्यमांच्या वृत्तानुसार हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना ताकीद दिली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांनी अनीता राज यांच्याबरोबर पुन्हा काम करणं बंद केल्याचं म्हटलं जातं.

रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या अफेअरच्या चर्चा रंगू झाल्यानंतर अनीता राज यांच्या करिअरवरही त्याचा परिणाम झाल्याचं म्हटलं जातं. मात्र, याच काळात त्यांच्याबद्दल आणखी एक धक्कादायक प्रसंग घडल्याची चर्चा होती. अभिनेते राजेंद्र कुमार यांच्या वागणुकीमुळे आठ महिन्यांची गरोदर असलेल्या अनीता राज यांचं मिसकॅरेज होता होता राहिल्याचं सांगितलं जातं. ‘लहरें रेट्रो’च्या माहितीनुसार ‘जरुरत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनीता राज गरोदर राहिल्या होत्या. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात त्या कोणतीही तक्रार न करता चित्रपटाचं शूटिंग करत राहिल्या. मात्र, आठव्या महिन्यात त्यांनी शूटिंग करण्यास नकार दिला.

असं म्हटलं जातं की, राजेंद्र कुमार यांनी त्यांना समजून घेतलं नाही आणि त्यांच्यावर शूटिंग करण्यासाठी दबाव आणला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनीता अचानक घसरुन पडल्या. त्यानंतर गरोदर अवस्थेतील अनीता यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. मात्र, प्रकरण आणखी गंभीर झालं, जेव्हा प्रसुतीच्या अवघ्या दोन दिवसांनंतरच राजेंद्र कुमार यांनी अनीता यांना पुन्हा सेटवर येऊन शूटिंग करण्यास सांगितलं. दबावामुळे अनीता यांनी ते शूटिंग केलंही; मात्र राजेंद्र कुमार यांच्या या वागणुकीमुळे त्या खूप नाराज झाल्याचं सांगितलं जातं.

आता कुठे आहेत अनीता राज?

बॉलीवूडमध्ये फार काही होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर अनीता राज यांनी टेलिव्हिजनमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिथेही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडत प्रेक्षकांची पसंती मिळवली. अनीता राज यांनी ‘तुम्हारी पाखी’, ‘छोटी सरदारनी’, ‘परिणीती’ आणि ‘सावी की सावी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अनीता राज ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत.