ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. १९९० च्या काळातील ते प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचा ‘शोले’ हा चित्रपट आजही अनेक जण तितक्याच आवडीने बघतात. यातील त्यांची अमिताभ यांच्या बरोबरीची जोडी त्याकाळी चांगलीच गाजली होती. अशातच आता धर्मेंद्र लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासह अरबाज खान झळकणार आहे. हे दोघेही तब्बल २७ वर्षांनंतर यामधून एकत्र काम करत आहेत. पूर्वी दोघांनी ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

अभिनेते धर्मेंद्र अरबाज खानसह एका नव्या चित्रपटातून झळकणार आहेत. ‘मैंने प्यार किया फिर से’ या चित्रपटातून हे दोघे दीर्घकाळानंतर एकमेकांसह काम करणार आहेत. रॉनी रॉड्रिग्ज यांनी ‘मैंने प्यार किया फिर से’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रॉनी रॉड्रिग्ज यांनी स्वत: या चित्रपटाची कथा व गाण्यांचे गीत लिहिले आहेत. नुकताच या आठवड्यात या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी अभिनेते राजपाल यादव, गणेश आचार्य, कंगना शर्मा, सुधाकर शर्मा, उदित नारायण, योगेश लखाणी यांसारखी मंडळी उपस्थित होती. माध्यमांच्या वृत्तानुसार प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी चित्रपटाच्या मुहूर्तादरम्यान यातील प्रदर्शित न झालेलं एक गाणं गायलं होतं.

धर्मेंद्र व अरबाज यांनी त्यांच्या ‘मैंने प्यार किया फिर से’ या आगामी चित्रपटाबद्दल सांगितलं आहे.’ मिड डे’च्या वृत्तानुसार ‘मैंने प्यार किया फिर से’ या चित्रपटाचं कौतुक करताना धर्मेंद्र म्हणाले, “हा खूप उत्कृष्ट चित्रपट आहे, यामधून प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होणार आहे. रॉनी रॉड्रिग्ज आणि या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह माझ्या शुभेच्छा आहेत. पुढे अरबाजबद्दल धर्मेंद्र म्हणाले, मला ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात त्याच्याबरोबर काम करताना खूप मज्जा आली होती, त्यामुळे मी या आगामी चित्रपटात त्याच्यासह काम करण्यासाठी उत्सुक आहे.” यासह अरबाज खाननेही धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगितलं आहे. अरबाज म्हणाला, “धर्मेंद्र यांच्यासह काम कराण्याची पुन्हा एकदा संधी मिळत आहे यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. मी रॉनी रॉड्रिग्ज व आमच्या संपूर्ण टीमला यानिमित्त खूप शुभेच्छा देऊ इच्छितो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान बाबा होणार आहे. त्याची दुसरी पत्नी शुरा लवकरच आई होणार आहे. शुरा त्याच्यापेक्षा जवळपास २२ वर्षांनी लहान आहे. शुरा व अरबाज दोघंही क्लिनिकबाहेर एकत्र दिसल्याने शुरा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्याने स्वत: पत्नी शुरा खान आई होणार असल्याची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे. ही बातमी त्याने नुकतीच ‘दिल्ली टाइम्स’शी संवाद साधताना दिली होती.