Veteran Actor Dharmendra’s Family : बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र सध्या त्यांच्या चिंताजनक प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. अभिनेते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावेळी त्यांना पाहायला त्यांची मुलं, मुली, पत्नी आणि नातवंडं रुग्णालयात जाताना दिसत आहेत. तर, बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीही त्यांना भेट दिली.
धर्मेंद्र हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. गेली सहा दशके ते या क्षेत्रात काम करीत असून, आजवर त्यांनी जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. धर्मेंद्र अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आले. अभिनेत्री हेमा मालिनी व त्यांची प्रेमकहाणी तर ९० च्या काळातील बॉलीवूडमधील गाजलेल्या प्रेमकहाण्यांपैकी एक आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, हेमा मालिनींबरोबर लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना चार मुलंही होती.
‘असं’ आहे धर्मेंद्र यांचं कुटुंब
‘इंडिया टीव्ही’च्या वृत्तानुसार धर्मेंद्र यांना एकूण सहा मुलं असून, त्यांचं देओल कुटुंब किती मोठं आहे? त्यांच्या मुली, मुलं आणि नातवंडं काय करतात ते जाणून घेऊ… धर्मेंद्र यांचं वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न झालेलं आणि या जोडीला दोन मुली व दोन मुलगे, अशी एकूण चार मुलं आहेत. तर, हेमा यांच्याबरोबरही लग्न झाल्यानंतर हेमा मालिनी व धर्मेंद्र यांनाही दोन मुली आहेत. एकंदरीत धर्मेंद्र यांची दोन लग्नं झाली असून, त्यांना दोन मुलगे व चार मुली आहेत.
धर्मेंद्र यांच्या सर्व मुलांची लग्नं झाली असून, त्यांना १३ नातवंडं आहेत. सनी देओलला दोन मुलं आहेत आणि बॉबी देओललाही दोन मुलं आहेत. त्यांची लेक विजेता देओलला एक मुलगी व एक मुलगा आहे आणि त्यांची दुसरी मुलगी अजिता देओलला दोन मुली आहेत. ईशा देओलला दोन मुली आहेत आणि धर्मेंद्र यांची सगळ्यात लहान मुलगी अहाना देओलला एक मुलगा व दोन मुली, अशी तीन मुलं आहेत.
सनी देओलने पूजा देओलबरोबर १९८४ मध्ये लग्न केलं आणि या जोडीला दोन मुलं आहेत. सनी देओलच्या मुलाचं करण देओलचं २०२३ मध्ये त्याची प्रेयसी द्रिशा आचार्यबरोबर लग्न झालं. धर्मेंद्र यांचा दुसरा मुलगा बॉबी देओल व त्याची बायको आणि मुलांबद्दल बोलायचं झालं, तर बॉबी देओलची बायको तान्या आहुजा देओल एक उद्योजक आहे. या दोघांनी १९९६ मध्ये लग्न केलं. या दोघांना आर्यमान व धरम अशी दोन मुलं आहेत.
धर्मेंद्र यांच्या चार मुली काय करतात?
धर्मेंद्र यांच्या मुलींबद्दल बोलायचं झालं, तर त्यांची मुलगी अजिता देओलही अभिनय क्षेत्रापासून दूर असून, ती पेशाने शिक्षिका आहे. यूएसएमध्ये ती शिक्षिका म्हणून काम करीत आहे. अजिताचे पती किरण चौधरी डेंटिस्ट असल्याचं म्हटलं जातं. या जोडीला निकिता व प्रियांका चौधरी अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांची दुसरी मुलगी विजेता देओलबद्दल बोलायचं झालं, तर विजेतानं विवेक गिलबरोबर लग्न केलं असून, त्यांना साहिल व प्रेरणा, अशी दोन मुलं आहेत. विजेता तिच्या पतीच्या कंपनीत संचालक म्हणून काम पाहते.
धर्मेंद्र व हेमा मालिनी यांच्या दोन मुली ईशा व अहाना देओलबद्दल बोलायचं झालं, तर ईशा देओलचं भरत तख्तानीबरोबर लग्न झालेलं. तिला दोन मुली आहेत. अलीकडेच त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. धर्मेंद्र यांची लहान मुलगी अहाना देओलनं वैभव वोहराबरोबर लग्न केलं असून, त्यांना तीन मुलं आहेत. अहाना व ईशा यांनी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, अहाना सध्या लाइमलाईटपासून दूर आहे.
