Dharmendra dies at 89: धर्मेंद्र यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले. ते बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘शोले’, ‘फूल और पत्थर’, ‘चुपके चुपके’, ‘यादों की बारात’, ‘प्रतिज्ञा’, ‘अनुपमा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

धर्मेंद्र यांच्या अनेक चित्रपटांतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या अनेक भूमिकांबद्दल आजही बोलले जाते.

धर्मेंद्र हे सोशल मीडियावरदेखील मोठे सक्रिय होते. ते कायमच विविध पोस्ट शेअर करत त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत असत. अनेकदा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून काही आठवणीदेखील शेअर करत असत. अनेकदा ते सुंदर शायरीदेखील शेअर करत असत. काही वेळा या माध्यमातून चाहत्यांना काही आयुष्याशी आधारित सल्लेदेखील देत असत.

धर्मेंद्र यांची ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची

धर्मेंद्र यांनी सात आठवड्यांपूर्वी शेवटची पोस्ट शेअर केली होती. दसऱ्याच्या दिवशी त्यांनी चाहत्यांना शुभेच्छा देणारा व्हिडीओ शेअर केला होता. ते या व्हिडीओमध्ये म्हणालेले, “सगळ्या भावा-बहि‍णींना, लहान मुला-मुलींना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. देव तुम्हाला निरोगी आरोग्य देओ, आनंद देओ. तुम्ही प्रामाणिक राहा, तुम्हाला यश मिळेलच”, असे म्हणत त्यांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडीओमध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे कर्मचारी दिसत आहेत.

या व्हिडीओवर सनी देओलने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत, तर नेटकऱ्यांनीदेखील कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

धर्मेंद्र यांनी ८७ व्या वर्षीदेखील चित्रपटांत काम केले. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मध्ये ते महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात आलिया आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसले होते.

याबरोबरच, धर्मेंद्र यांनी ‘इक्कीस’ या चित्रपटातदेखील महत्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच धर्मेंद्र यांचे निधन झाले.