Dharmendra Health Updates : बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, आता ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती देओल कुटुंबीयांनी दिली आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी ( १२ नोव्हेंबर ) सकाळी रुग्णवाहिकेतून घरी नेण्यात आलं. यावेळी त्यांच्याबरोबर बॉबी देओल देखील होता. आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉ. प्रतित समदानी यांनी पीटीआयशी संवाद साधताना धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी दिली आहे. डॉक्टर म्हणाले, “धर्मेंद्र यांना सकाळी ७:३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयानुसार इथून पुढे राहत्या घरी धर्मेंद्रजी यांच्यावर उपचार केले जातील.”
याशिवाय सनी देओलच्या मॅनेजरने सुद्धा धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ते घरीच उपचार घेतील. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी या काळात कोणत्याही अफवा पसरवू नयेत. देओल कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा.” असं सनीच्या टीमने अधिकृत माहिती देत म्हटलं आहे.
दरम्यान, धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील अनेक अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यावर त्यांच्या पत्नी हेमा मालिनी व मुलगी ईशा देओल यांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे देओल कुटुंबीयांनी प्रायव्हसीचा आदर करून खोट्या बातम्या पसरवू नका अशी विनंती सर्वांना केली आहे.
