Dharmendra First Love Hamida Pakistan Partition Story: बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र हे त्यांच्या सिनेमांबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर व दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्याबद्दल सर्वांना माहीत आहे; पण त्यांना शाळेमध्ये असताना पहिले प्रेम झाले होते. सध्याच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबमधील शाळेतील मुलीवर त्यांना प्रेम जडले होते. सलमान खानच्या ‘दस का दम’ या कार्यक्रमात धर्मेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण सांगितली होती.
धर्मेंद्र यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या शाळेत एक हमीदा नावाची मुलगी होती. विशेष म्हणजे ती शाळेतल्याच एका शिक्षकाची मुलगी होती. धर्मेंद्र हे मूळचे पंजाबचे असून, त्यांचे बालपण हे पंजाबमधील एका गावात गेले. ते सहावीत शिकत असताना त्यांच्या मनात हमीदाबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमावर कवितासुद्धा लिहिली होती. त्यावेळी पंजाबची फाळणी झाली नव्हती.
हमीदा या धर्मेंद्र यांच्यापेक्षा होत्या वयाने मोठ्या
हमीदा या धर्मेंद्र यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. धर्मेंद्र सहावीत, हमीदा आठवीत शिकत होत्या. त्यावेळी धर्मेंद्र अतिशय लाजाळू होते. त्यामुळे मनात भावना असूनही ते हमीदा यांच्याशी बोलण्याची किंवा त्यांना स्वत:च्या मनातील गोष्ट सांगण्याची हिंमत करू शकले नाहीत. ते फक्त लांबून व लपून तिच्याकडे पाहायचे आणि तिच्याजवळ बसण्याचा विचार करायचे. मात्र, धर्मेंद्र यांची ही प्रेमकहाणी कधीच पूर्ण होऊ शकली नाही. याचे कारण ठरले – भारत आणि पाकिस्तानची फाळणी.
भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमध्ये पंजाबमधील धर्मेंद्र यांचे गाव पाकिस्तानमध्ये गेले. फाळणीनंतर हमीदा पाकिस्तानात गेल्या. त्या गेल्यावर धर्मेंद्र यांना वाईट वाटले आणि ते खूप निराश झाले होते. त्यावेळी हमीदा यांनी धर्मेंद्र यांना समजावत, “काळजी करू नकोस, सगळे नीट होईल,” असे म्हणत धीर दिला होता.
१९व्या वर्षी झाले झाले पहिले लग्न
धर्मेंद्र यांनी १९५४ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले. त्यावेळी धर्मेंद्र यांचा बॉलीवूडमधील प्रवास सुरू झाला नव्हता. त्यांचे पहिले लग्न हे घरच्यांनी ठरवलेले होते. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी धर्मेंद्र मुंबईत आल्यानंतर प्रकाश कौर यांनी पंजाबमध्ये राहून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. या दाम्पत्याची सनी देओल, बॉबी देओल, विजेता व अजीता अशी चार अपत्ये आहेत.
हेमा मालिनी यांच्याबरोबर सुरू झाली प्रेमकहाणी
चित्रपटसृष्टीत काम करीत असताना १९७० च्या दशकात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एकमेकांच्या जवळ आले. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, धर्मेंद्र आधीच विवाहित असल्याने त्यांच्या लग्नाचा मार्ग सोपा नव्हता; पण दुसऱ्या लग्नानंतरही धर्मेंद्र यांनी कुटुंबाची साथ कधीच सोडली नाही. त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर व मुलांचीही काळजी घेतली. प्रकाश कौर यांनीही धर्मेंद्र यांना कायम पाठिंबा दिला. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या ईशा देओल व अहाना देओल अशा दोन मुली आहेत.
