Dharmendra Flirting Secret Jaya Prada : बॉलीवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सिनेविश्वाचा एक काळ गाजवला होता. दमदार अभिनय आणि जबरदस्त लूक यांमुळे अनेक तरुणी धर्मेंद्र यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्या. अनेक कलाकार धर्मेंद्र यांच्या सेटवरील आठवणी सांगताना दिसतात. एकदा जया प्रदा यांनी सर्व अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्र सर्वांत जास्त फ्लर्ट करीत असल्याचे सांगितले होते.

जया प्रदा या कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बॉलीवूडमधील अनुभव व आठवणी सांगितल्या होत्या. त्यादरम्यान जया प्रदा यांनी ‘बॉलीवूडचे ही-मॅन‘ यांचाही आवर्जून उल्लेख करीत, ते सर्वांत जास्त फ्लर्ट करीत असल्याचे सांगितले होते. कपिलने जया प्रदांना विचारले, “तुमच्याबरोबर सर्वांत जास्त फ्लर्ट कोण करायचं?” त्यावर अभिनेत्री म्हणाल्या, “मी खरंच हे सांगू का?” त्यानंतर त्या हसत म्हणाल्या, “धर्मेंद्र.” त्यानंतर त्यांना सेटवर सर्वांत उशिरा कोण यायचं, असं विचारण्यात आलं. त्यावर जयाप्रदा म्हणाल्या, “राजेश खन्ना खूप उशिरा यायचे. खरंच!”

राजेश खन्नांच्या ‘या’ सवयीचा केला उल्लेख

जया प्रदा पुढे म्हणाल्या, “मी दाक्षिणात्य सिनेविश्वातून आले असून, तिथे मी खूप काम केले आहे. त्यामुळे मी सकाळी ७ वाजताच सेटवर पोहोचायचे; पण इथे आल्यानंतर निर्माते मला सकाळी ९ वाजता सेटवर बोलवायचे. सेटवर आल्यानंतर मी माझा मेकअप करायचे. ते (राजेश खन्ना) रात्री ८ वाजताच्या आसपास यायचे. ते तिथे आल्यानंतर ते वडापाव खायचे. त्यानंतर एक शॉट द्यायचे आणि रात्री ९ वाजता पॅकअप करायचे.”

पाच शिफ्टमध्ये करत होत्या काम

जया प्रदा यांनी बॉलीवूडमध्ये सुरुवातीला काम करताना, पाच शिफ्टमध्ये काम केल्याचे सांगितले. ‘शराबी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्या उटीहून प्रवास करायच्या. संध्याकाळची ट्रेन पकडून चेन्नईला जायच्या. चेन्नई विमानतळावर फ्रेश व्हायच्या आणि त्यानंतर फ्लाईटने प्रवास करायच्या. फ्लाईटमध्येच त्या मेकअप करायच्या.

त्या पुढे म्हणाल्या, “त्यानंतर मी कोईम्बतूरला पोहोचायचे आणि अशा पद्धतीनं सगळं मॅनेज करायचे. मी त्यांना नकार देऊ शकत नव्हते. साऊथमध्ये काम करताना सगळे चांगले, मोठे आणि आयकॉनिक हीरो होते. एन. टी. रामाराव, राजकुमार सर वगैरे. त्यांच्या तुलनेत मी खूपच लहान मुलगी होते. तेव्हा माझं वय १६ किंवा १७ वर्षं होते आणि त्यामुळे मला भीती वाटायची. हे सगळं करणं खूप अवघड होतं; पण त्याचबरोबर स्वतःचा अभिमानही वाटायचा.”