Dharmendra’s Popular Movies: बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामध्ये राजेश खन्ना, संजीव कुमार, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, श्रीदेवी, रेखा, परवीन बाबी, झीनत अमान या आणि अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

त्यामध्ये धर्मेंद्र यांचे नावदेखील प्रामुख्याने घेतले जाते. ‘शोला और शबनम’, ‘शीशा और सुरत’, ‘दिल भी तेरा हम भी तेरे’, अशा अनेक चित्रपटांतून धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. बॉलीवूडच्या यशात धर्मेंद्र यांच्या चित्रपटांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे त्यांनी एकाच प्रकारच्या भूमिका साकारल्या नाहीत. तर त्यांनी रोमँटिक, भावूक, गंभीर व विनोदी अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. आज आपण त्यांच्या गाजलेल्या आणि सर्वांनी पाहायलाच हवेत अशा १० चित्रपटांबद्दल जाणून घेऊ…

१. शोले

धर्मेंद्र यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी शोले हा एक सिनेमा आहे. १९७५ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील जय-वीरूची मैत्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील त्यांची हेमा मालिनी यांच्याबरोबरची केमिस्ट्री, अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचे विनोदाचे टायमिंग, एकापेक्षा एक संवाद यांमुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा त्यांचा डायलॉग प्रचंड लोकप्रिय ठरला होता. पिढ्यान् पिढ्या या चित्रपटाच्या चाहत्या आहेत.

२. चुपके चुपके

हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९७५ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील भूमिकेतून धर्मेंद्र यांनी दाखवून दिले की, अॅक्शन हीरोसुद्धा कॉमेडी करू शकतात. त्यांच्या परिमल त्रिपाठी या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते.

३. फूल और पत्थर

‘फूल और पत्थर’ या चित्रपटामुळे धर्मेंद्र यांच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. अनेक समीक्षकांनी त्यांच्या चित्रपटाचे कौतुक केले. हा चित्रपट १९६६ ला प्रदर्शित झाला.

४. सत्यकाम

सत्यकाम हा चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. सगळीकडे भ्रष्टाचार होत असताना सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली होती. हा चित्रपट १९६९ ला प्रदर्शित झाला होता.

५. मेरा गाँव मेरा देश

‘शोले’ प्रदर्शित होण्यापूर्वी धर्मेंद्र यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९७१ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. हा चित्रपट म्हणजे अॅक्शन आणि भावना यांचे मिश्रण होता. सिनेमातील ‘अँग्री यंग मॅन’ची भूमिका अनेकांनी भावली होती.

६. सीता और गीता

सीता और गीता हा एक रोमँटिक चित्रपट होता. हेमा मालिनीदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या. चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने लक्ष वेधून घेतले होते. १९७२ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

७. अनुपमा

अनुपमा हा सिनेमा १९६६ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा रोमँटिक चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी एका शांत व दयाळू कवीची भूमिका साकारली होती. ही भूमिका त्यांच्या अन्य भूमिकांहून अतिशय वेगळी आहे. या चित्रपटात शर्मिला टागोर त्यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत होत्या.

८. राजा रानी

राजा रानी हा चित्रपट प्रचंड गाजला. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात हेमा मालिनीदेखील प्रमुख भूमिकेत होत्या.

९. हकीकत

हकीकत हा सिनेमा देशभक्तीपर होता. सुपरस्टार होण्याआधी धर्मेंद्र यांनी ज्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली, तो चित्रपट हकीकत हा होता. १९६४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

१०. प्रतिज्ञा

प्रतिज्ञा या चित्रपटात धर्मेंद्र यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. विनोद, अॅक्शन्स व भावना यांचे मिश्रण असलेला हा चित्रपट खूप गाजला. हा चित्रपट १९७५ ला प्रदर्शित झाला होता.