Dharmendra Prayer Meet: दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. निधनाच्या चार दिवसांनी धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे आयोजित करण्यात आली. फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसह अनेकांनी प्रार्थनासभेला उपस्थित राहून धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि देओल कुटुंबाला या कठीण काळात धीर दिला.

धर्मेंद्र यांचं जाणं हा देओल कुटुंबासाठी खूप कठीण काळ आहे. धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली. या प्रार्थना सभेतील अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही फोटोंमध्ये सनी देओल व बॉबी देओल पाहुण्यांना भेटताना दिसत आहेत. या फोटोत सनी व बॉबी भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय.

या फोटोमध्ये सनी आणि बॉबी त्यांच्या वडिलांच्या प्रार्थना सभेत एकत्र उभे असल्याचं दिसत आहे. दोघेही साधे पांढरे कपडे घालून आले होते. हात जोडून पाणावलेल्या डोळ्यांनी सनी पाहुण्यांना ‘नमस्ते’ म्हणत स्वागत करताना दिसत आहे. बॉबी त्यांच्या शेजारी उभा असलेला दिसतो. त्यांच्या मागे धर्मेंद्र यांचा एक फोटो आहे. फोटोभोवती फुलांची सजावट केलेली आहे.

Award Banner

पाहा फोटो –

प्रार्थना सभा संध्याकाळी ५:३० वाजता सुरू झाली आणि रात्री ८ वाजता संपली. देओल कुटुंबाव्यतिरिक्त, शाहरुख खानचे कुटुंबीय देखील या प्रार्थना सभेला उपस्थित होते. त्याचबरोबर ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, सलमान खान, माधुरी दीक्षित, विद्या बालन, शबाना आझमी, जॅकी श्रॉफ, सिद्धार्थ मल्होत्रा, सुनील शेट्टी, अमीषा पटेल, फरदीन खान, निमरत कौर, सोनू सूद, अनु मलिक, सुभाष घई, अब्बास-मस्तान आणि अनिल शर्मा यांच्यासह इतर अनेक जणांनी या प्रार्थना सभेला उपस्थित राहून धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली.

धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले. ८ डिसेंबर रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस होता, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी नेण्यात आलं. घरीच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.