हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देओल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी प्रकाश कौर व हेमा मालिनी यांच्यासाठी हा एक कठीण काळ आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी देओल कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आहेत.
६५ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या धर्मेंद्र यांनी करिअरमध्ये ३०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. ते कोट्यवधींची मालमत्ता मागे सोडून गेले आहेत. धर्मेंद्र यांच्या मुलांमध्ये ही संपत्ती विभागली जाईल. पण धर्मेंद्र यांच्या मालमत्तेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना वाटा मिळेल का? धर्मेंद्र यांच्या मालमत्तेवर त्यांचा कायदेशीर हक्क आहे का? याबद्दल जाणून घेऊयात.
धर्मेंद्र यांचे दोन विवाह व अपत्ये
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचे लग्न १९५४ साली झाले होते. तेव्हा धर्मेंद्र फक्त १९ वर्षांचे होते. या जोडप्याला मुलं सनी आणि बॉबी देओल आणि मुली अजिता आणि विजेता ही चार अपत्ये आहेत. १९७० मध्ये, धर्मेंद्र हेमा मालिनी यांना ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि पुढे ते प्रेमात पडले. त्यांनी १९८० मध्ये लग्न केले होते. या दोघांना ईशा आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.
धर्मेंद्र-हेमा मालिनींना धर्मांतर केल्याच्या अफवा पसरल्या होत्या
धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनींशी लग्न केलं होतं. पहिला घटस्फोट झाला नसेल तर दुसरं लग्न वैध नसतं. त्यामुळे धर्मेंद्र व हेमा मालिनींनी इस्लाम स्वीकारून लग्न केल्याच्या अफवाही एकेकाळी पसरल्या होत्या. त्यावर धर्मेंद्र व हेमा मालिनी दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या.

२००४ मध्ये धर्मेंद्र यांनी लोकसभा निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रात फक्त पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या संपत्तीची माहिती दिली होती, हेमा मालिनी यांचा उल्लेख कुठेच नव्हता, हा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला होता. तेव्हा हेमा मालिनींनी यावर उत्तर दिलं होतं. “ही आमच्या दोघांमधील अत्यंत खासगी बाब आहे आणि आम्ही ती आपापसात सोडवू. इतर कोणीही याची काळजी करण्याची गरज नाही. या आरोपांमध्ये तथ्य नाही. याविषयी मला आणखी काही बोलायचं नाही,” असं हेमा म्हणाल्या होत्या.
धर्मेंद्र यांनी इस्लाम स्वीकारण्याचे वृत्त फेटाळले होते
“हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी असा माणूस नाही जो धर्म बदलेल”, असं धर्मेंद्र २००४ मध्ये आउटलुकशी बोलताना म्हणाले होते. धर्मेंद्र व हेमा मालिनी यांच्या प्रतिक्रियांचा उल्लेख हेमा यांच्यावरील Hema Malini: Beyond the Dream Girl या पुस्तकात आहेत.
कायदेशीरदृष्ट्या, धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनींशी दुसरं लग्न केलं होतं, त्यामुळे तर हेमा यांना मालमत्तेत कोणताही वाटा मिळणार नाही. कारण हिंदू विवाह कायद्यानुसार, पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करणं वैध नाही. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करणे बेकायदेशीर मानलं जातं.
धर्मेंद्र यांची मालमत्ता ४००-४५० कोटी आहे, असं म्हटलं जातंय. हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या मालमत्तेत वाटा मागू शकत नाहीत, परंतु त्यांच्या मुली, ईशा देओल आणि अहाना देओल, त्यांच्या मालमत्तेत कायदेशीर वाटा मागू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलांना वारसा हक्क मिळतो.
