धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या प्रार्थनासभेला दुसरी पत्नी हेमा मालिनी व मुली गैरहजर राहिल्या. त्यामुळे चर्चा सुरू आहेत. धर्मेंद्र यांची दोन्ही कुटुंबे कोणत्याच चांगल्या-वाईट प्रसंगात एकत्र आली नाहीत. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीपासून दोन मुलं व दोन मुली अशी चार अपत्ये असूनही हेमा मालिनींशी दुसरं लग्न केलं होतं. धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या कुटुंबाला पहिल्या कुटुंबाने कधीच स्वीकारलं नाही.
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी लग्न केलं, त्यानंतर त्या कधीच प्रकाश कौर यांना भेटल्या नव्हत्या. लग्नाआधी प्रकाश कौर यांना भेटल्याचं हेमा मालिनींनी सांगितलं होतं. राजीव विजयकर यांनी ‘धर्मेंद्र: नॉट जस्ट अ ही-मॅन’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी प्रकाश कौर यांना भेटल्याची आठवण सांगितली होती. त्यांनी प्रकाश यांना “एक सुंदर आणि समाधानी स्त्री” असं ते म्हणाले होते. ते प्रकाश यांना फक्त काही मिनिटांसाठी भेटले होते.
प्रकाश कौर यांनी गृहिणी असूनही धर्मेंद्र यांना आयुष्यात एक मजबूत आधार दिला. प्रकाश यांना त्यांच्या कुटुंबाची खूप काळजी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ईशा देओलचे भरत तख्तानीशी लग्न होण्यापूर्वी, प्रकाश त्यांच्या सावत्र मुलीसाठी स्थळ शोधत होत्या. “सामान्य लोकांना हे अशक्य वाटेल, पण धर्मेंद्र यांनी मला एकदा सांगितलं होतं की, प्रकाश ईशासाठी चांगला मुलगा शोधत आहे,” असं लेखकाने लिहिलंय. हा प्रसंग ईशाने भरत तख्तानीशी लग्न केलं, त्यापूर्वीचा आहे.
…अन् विमानतळावरून अचानक गायब झालेल्या प्रकाश कौर
याच पुस्तकात लेखकाने ज्येष्ठ पत्रकार भारती एस प्रधान यांनी सांगितलेला एक प्रसंग लिहिलाय. भारती यांनी प्रकाश कौर यांना विमानतळावर पाहिलं होतं आणि त्या बोलायला जवळ जाताच त्या गायब झाल्या होत्या. “धर्मेंद्र खूप आदराने वागायचे, पण एक लक्ष्मण रेखा होती. आम्ही त्यांच्या पत्नी किंवा मुलींच्या जवळ पोहोचू शकलो नाही. आम्ही कधीही मर्यादा ओलांडल्या नाहीत. ते खूप चांगले आहेत. एकदा मी प्रकाश यांना विमानतळावर बसलेलं पाहिलं आणि मी त्यांच्याकडे बघून हसले, त्याही हसल्या पण मी तिथे जाताच त्या तिथून गायब झाल्या होत्या,” असं भारती यांनी सांगितलं होतं.
ईशाच्या लग्नात गेले नव्हेत देओल कुटुंबीय
ईशाने २०१२ मध्ये भरत तख्तानीशी लग्न केलं आणि २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. एकेकाळी प्रकाश कौर यांनी ईशासाठी मुलगा शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण पण ईशाच्या लग्नात मात्र त्यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हतं. प्रकाश, सनी, बॉबी यापैकी कुणीच लग्नात आलं नव्हतं. देओल कुटुंबातील सर्वच लग्नात असंच चित्र पाहायला मिळालं. धर्मेंद्र यांची दोन्ही कुटुंबे कधीच एकत्र आली नाहीत. २०२३ मध्ये सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नात हेमा मालिनी व त्यांच्या मुली आल्या नव्हत्या.
ईशाने याच पुस्तकात लिहिलंय की ती चौथीत असताना तिला वडिलांच्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल समजलं. “तेव्हा मला समजलं की माझ्या आईने अशा व्यक्तीशी लग्न केलंय, ज्यांचं लग्न आधीच दुसऱ्या महिलेशी झालं आहे आणि त्यांचेही एक कुटुंब आहे. पण खरं सांगायचं झाल्यास मला कधीच वाईट वाटले नाही. त्यात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही,” असं ईशाने म्हटलं होतं.
