Dharmendra govinda dispute : बॉलीवूडचे ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये जगाचा निरोप घेतला असला तरी, त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यांनी अॅक्शन सीन आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात वेगळी ओळख निर्माण केली होती. धर्मेंद्र यांच्या चित्रपटांच्या सेटवरील किस्से आजही रंगतात. असाच ९० च्या दशकामध्ये आलेला ‘आवारगी’ हा चित्रपट गाजला होता, पण कथेमुळे नाही तर या सेटवर झालेल्या घटनेमुळे. धर्मेंद्र यांनी तेव्हा यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेता गोविंदाच्या कानशिलात लगावली होती, असा दावा केला जातो.
गोविंदा हा ९० च्या दशकात लोकप्रियतेच्या आणि भरभराटीच्या शिखरावर होता. प्रत्येकाच्या तोंडी त्याचं नाव असायचं. त्याची हटके डान्स स्टाइल आणि अभिनयाचं सर्वत्र कौतुक व्हायचं. त्याने ‘आवारगी’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारली, मात्र जसजशी चित्रपटाची कथा पुढे सरकली तसतसे निर्माते कथेमध्ये बदल करत होते. अनेक नवीन पात्रे चित्रपटाच्या कथेमध्ये आली आणि गोविंदाने आपली नाराजी व्यक्त केली. निर्मिती प्रक्रियेतील बदल आणि कलाकारांच्या निवडीत झालेल्या नवीन समावेशांमुळे गोविंदाचे मतभेद निर्माण झाले अन् याची चर्चा सर्वत्र रंगू लागली.
‘आवारगी’च्या निर्मात्यांवर गोविंदाची नाराजी
सुरुवातीला ‘आवारागी’ या चित्रपटात गोविंदा आणि मीनाक्षी शेषाद्री हे दोघे मुख्य भूमिकांमध्ये काम करणार होते. मात्र नंतर चित्रपटामध्ये अनिल कपूर यांना घेण्यात आलं, ज्यामुळे चित्रपटाचे स्वरूपच बदलून गेलं. News18 च्या वृत्तानुसार, गोविंदाला अनिल कपूर यांच्यासोबत काम करायचं नव्हतं. आपली बाजू मांडण्यासाठी गोविंदा धर्मेंद्र यांच्या घरी गेला. धर्मेंद्र हे नाराज दिसत होते, तरीही त्यांनी गोविंदाचं म्हणणं ऐकून घेतली. मात्र गोविंदाची नाराजी दूर झाली नाही.
आजही पडद्यामागील गप्पांमध्ये रंगतो हा प्रसंग
याच काळात चित्रपटाच्या सेटवर धर्मेंद्र यांनी गोविंदाला कानशिलात लगावल्याच्या चर्चा रंगू लागल्या. सुपरस्टार झालेल्या गोविंदाला धर्मेंद्र यांनी मारल्याची अफवा सिनेविश्वात हवेसारखी पसरली आणि पडद्यामागच्या गप्पांमध्ये कायम रंगत राहिली. मात्र नंतरच्या काळात अभिनेते धर्मेंद्र यांनी या सर्व मारहाणीच्या दाव्यांचे ठामपणे खंडन केले. परिस्थिती हळूहळू निवळली असली, तरीही आजही पडद्यामागील गैरसमजातून निर्माण झालेल्या या प्रसंगांचा वारंवार उल्लेख केला जातो.
काय होती आवारगी चित्रपटाची कथा ?
९०च्या दशकाच्या मध्ये प्रदर्शित झालेला ‘आवारगी’ या चित्रपटामध्ये गंभीर प्रेमकथा रंगवण्यात आली होती. महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये आझाद नावाचा गुंड प्रतिस्पर्ध्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन ‘सीमा’ला वेश्यालयातून सोडवून आणतो आणि संगीत विश्वामध्ये ओळख निर्माण करण्यासाठी मदत करतो. तिच्या या प्रवासात तिला साथ देण्यासाठी तो ‘धीरेन’ भेटतो. यामध्ये अनिल कपूरने आझाद, मीनाक्षी शेषाद्रीने सीमा आणि गोविंदाने धीरेनची भूमिका साकारली होती.
