Anil Sharma recalls Dharmendra last moments: काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले, तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ते बरे होऊ शकले नाहीत. २४ नोव्हेंबर २०२५ ला त्यांचे निधन झाले.
बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याने ८९ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. आता चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांचे शेवटच्या दिवसांबद्दल वक्तव्य केले आहे. अनिल शर्मा आणि देओल कुटुंबीयांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांची प्रकृती कशी होती, याबद्दल अनिल शर्मा यांनी वक्तव्य केले. त्यावेळी ते बरे होत असल्याची लक्षणे दिसत होती. ते पूर्ण बरे होतील अशी सर्वांसह डॉक्टरांनादेखील आशा होती.
“ते डोळे उघडत…”
विकी लालवाणीला दिलेल्या मुलाखतीत अनिल शर्मा म्हणाले, “मी त्यांच्या घरी गेलो होतो, ते बरे होत होते, ते डोळे उघडत होते, हातांची हालचाल करत होते, ते बरे होत होते; धरमजी खूप स्ट्राँग आहेत असे डॉक्टर म्हणत होते.”
ते पुढे म्हणाले, “डॉक्टरांनीही ते बरे होतील असे आश्वासन दिले होते. रुग्णालयातही ते बरे होतील असे वाटत होते, पण वय त्याची लक्षणे दाखवते आणि वयासमोर तुम्ही काहीही करू शकत नाही. सर्वांना आशा होती की ते बरे होतील आणि आम्ही ८ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा करू. सर्वजण तयारी करत होते.” ८ डिसेंबरला धर्मेंद्र ९० वर्षांचे झाले असते.
अनिल शर्मा आणि देओल कुटुंब
अनिल शर्मा आणि धर्मेंद्र यांनी पहिल्यांदा १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हुकूमत’ या चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ऐलान-ए-जंग’, ‘फरिश्ते’ आणि ‘तहलका’ या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र प्रमुख भूमिकेत दिसले.
धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल यांच्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शनही अनिल शर्मा यांनी केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘सिंग साब द ग्रेट’ आणि ‘गदर २’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये अनिल शर्मा आणि सनी देओल यांनी एकत्र काम केले.
२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ या चित्रपटात बॉबी देओल प्रमुख भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील अनिल शर्मा यांनी केले होते. याबरोबरच अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अपने’ या सिनेमात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल दिसले होते.
दरम्यान, धर्मेंद्र यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘इक्कीस’ हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
