Durga Dharna Work with Madhuri Dixit : सोशल मीडियावरील रिल्सपासून थेट बॉलीवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या कंटेंट क्रिएटर धरना दुर्गाने आता अभिनेत्री म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘मांं बहन’ चित्रपटात तिने माधुरी दीक्षित व तृप्ती डिमरी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असताना, माधुरी दीक्षितसह काम करण्याचा अनुभव आणि चित्रपटाचे नाव ऐकल्यानंतर आलेली पहिली प्रतिक्रिया धरनाने नुकतीच शेअर केली आहे.
कंटेंट क्रिएटर म्हणून लोकप्रिय झालेल्या धरनासाठी हा चित्रपट करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरला. मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर रिल्स बनवणाऱ्या धरनाला थेट बॉलीवूडमध्ये संधी मिळाली. माधुरी दीक्षितसह अभिनेत्रीसह अभिनय करण्याची संधी तिला मिळाली असली तरी त्यामागे तिची अथक मेहनत आहे. दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्या ‘मां बहन’ या चित्रपटात तिने साकारलेले सुषमा हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. चित्रपटाचे वेगळे शीर्षक ऐकून सुरुवातीला तिलाही आश्चर्य वाटले होते आणि नेमका हा चित्रपट कसा असेल, याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे धरनाने सांगितले.
रिल्स व सिनेमामध्ये हाच सर्वांत मोठा फरक
‘मां बहन’ चित्रपटातील भूमिकेबाबत धरना दुर्गा म्हणाली, “फक्त स्वतःचे इन्स्टाग्राम रील्स बनवण्यापासून ते एखाद्या पूर्ण चित्रपटाच्या सेटवर काम करण्यापर्यंतचा हा प्रवास पूर्णपणे वेगळा होता. तांत्रिकदृष्ट्यादेखील हा प्रवास वेगळा होता. पण, सुरुवातीला माधुरीसह काम करण्याचे जे दडपण वाटत होते; प्रत्यक्षात काम करताना मात्र असा कोणताही अनुभव आला नाही. घरी रिल्स करत असताना कॅमेऱ्याच्या मागे फारसे लोक नसतात; पण चित्रपटाच्या सेटवर मात्र तोच प्रसंग वेगवेगळ्या ॲंगलने खूप वेळा चित्रित केला जातो. हाच सर्वांत मोठा फरक होता.”
सेटवर कधीच अस्वस्थ किंवा परकी असल्यासारखं वाटलं नाही – धरना
धरनाचा हा पहिलाच चित्रपट असून, शूटिंगच्या सेटवर तिला खूप काही शिकायला मिळाले आणि वेगळाच अनुभव मिळाला. त्याचे श्रेय तिने दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, लेखिका पूजा तोलानी व सिनेमॅटोग्राफर अनुज राकेश धवन यांना दिले आहे. धरना म्हणाली, “सेटवर मी अगदी नवखी असल्यामुळे सुरुवातीला थोडी घाबरले होते; पण संपूर्ण टीमने इतक्या आपुलकीने वागवलं आणि मोकळेपणानं काम करता येईल, असं वातावरण तयार केलं की, माझा आत्मविश्वास वाढला. अभिनयातील अनेक बारकावे शिकायला मिळाले. या संपूर्ण प्रवासातून मी खूप काही शिकले. शूटिंगच्या सेटवर मला कधीच अस्वस्थ किंवा परकी असल्यासारखं वाटलं नाही. सर्वांनी इतकं मनापासून स्वागत केलं की, मी तिथली नाही, असं एकदाही जाणवलं नाही”
पहिल्याच चित्रपटामध्ये तिने बॉलीवूडमधील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षितसह स्क्रीन शेअर केली. या विलक्षण अनुभवाबद्दल विचारले असता ती म्हणाली, “काही स्वप्नं अशी असतात की, ती अशक्य वाटत असल्यामुळे आपण ती कधीच विशलिस्टमध्ये लिहीत नाही. अशी स्वप्नं आपण लिहायलाही घाबरतो आणि मग ती प्रत्यक्षात साकार होतात. अगदी तसाच अनुभव मला आता येत आहे.”
दुर्गा धरना अनपेक्षितपणे झाली कंटेंट क्रिएटर
विशेष म्हणजे धरनाचा कंटेंट क्रिएटर बनण्याचा प्रवासही अगदी अनपेक्षितपणे सुरू झाला. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये मित्र-मैत्रिणींसह मजा म्हणून व्हिडीओ केले आणि तिचं आयुष्य पालटलं. धरना म्हणाली, “आम्ही मित्रमंडळी एकमेकांना चॅलेंज देत मजेशीर व्हिडीओ बनवायचो. त्यावेळी एका मैत्रिणीनं मला हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा सल्ला दिला. खरं सांगायचं तर, मी सोशल मीडियावर फारशी सक्रियही नव्हते. अनेकदा अकाउंट बंद करून पुन्हा सुरू करायचे. एक व्हिडीओ पोस्ट केला आणि तो मला आवडला. त्यानंतर हळूहळू आणखी व्हिडीओ बनवत गेले. कंटेंट क्रिएटर बनण्याचा कोणताही प्लॅन नव्हता. हे सगळं अगदी सहज आणि अनपेक्षितपणे घडलं.”
