Doctor Palash Sen Euphoria Singer: ९० च्या दशकात जिथे फक्त बॉलीवूड संगीताचे वर्चस्व होते, तिथे एका ऑर्थोपेडिक सर्जनने आपल्या आवाजाने इंडियन पॉप-रॉक संगीताला एक नवी ओळख मिळवून दिली. ‘युफोरिया’ (Euphoria) या पहिल्या हिंदी रॉक बँडचा संस्थापक आणि मुख्य गायक डॉ. पलाश सेन दिवसा रुग्णांवर उपचार करायचा आणि संध्याकाळी स्टेजवर हजारो चाहत्यांना मंत्रमुग्ध करायचा. ‘माई री’, ‘महफूज’, ‘धूम पिचक धूम’ सारखी एव्हरग्रीन गाणी देणारा पलाश बॉलीवूडच्या राजकारणाचा बळी ठरला आणि इंडस्ट्रीपासून दूर झाला.

आपल्या गाण्यांच्या माध्यमातून पलाशने एका पूर्ण पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याच्या संगीतात रोमान्स होता, उत्साह होता. त्याचा आवाज थेट काळजाला भिडायचा. गायक, गीतकार, संगीतकार, डॉक्टर, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी म्हणजे पलाश सेन. २३ सप्टेंबर १९६५ रोजी लखनऊमध्ये त्याचा जन्म झाला. पलाश मूळचा वाराणसीच्या सेन कुटुंबातील आहे. त्याच्या कुटुंबात अनेक पिढ्यांपासून सगळे डॉक्टर आहेत. पलाशही अभ्यासात हुशार होता. शालेय शिक्षणानंतर त्याने दिल्लीच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस’मधून एमबीबीएस आणि त्यानंतर ऑर्थोपेडिक्समध्ये एमएस पूर्ण केले. घरात सगळे डॉक्टर असले तरी त्याच्या कुटुंबात संगीताचे वातावरणही होते.

धूम पिचक धूम गाणं अन् युफोरियाची क्रेझ

पलाशला गिटार वाजवून गाणं गायला आणि मुलींना इम्प्रेस करायला खूप आवडायचं. कॉलेजमध्ये तो अनेकदा परफॉर्म करायचे. याच आवडीपोटी १९८८ मध्ये त्याने त्याच्या काही मित्रांसोबत एक बँड सुरू केला. त्याचं नाव ‘युफोरिया’ ठेवलं. हा भारतातील पहिला हिंदी रॉक बँड होता. कॉलेज संपलं की ते लहान-लहान इव्हेंट्समध्ये परफॉर्म करायचे. अशीच १० वर्षे निघून गेली. मग १९९८ साली ‘धूम पिचक धूम’ गाणं रिलीज झालं. हे गाणं त्याकाळी व्हायरल झालं होतं. टीव्ही, डीव्हीडी, रेडिओ, कॅसेट सगळीकडे पलाश आणि त्याच्या या गाण्याचीच चर्चा होती. त्यानंतर यूफोरियाने आपला पहिला अल्बम ‘धूम’ लाँच केला. हा अल्बम सुपरहिट झाला. १९९८ ते २००५ पर्यंत पलाशच्या बँडचीच क्रेझ होती. अशा रितीने युफोरिया भारतातला नंबर वन बँड बनला.

पलाश सेनचे चित्रपट

पलाशने फक्त गायनच नाही तर अभिनयातही नशीब आजमावलं. फिलहाल, ऐसा ये जहां, जिया जाए, एकतर्फा, हम तुम शबाना, लम्हा, ढुंडते रह जाओगे, कुकू माथुर की झंड हो गई असे चित्रपट त्याने केले. पलाशला यश मिळालं, पण त्याच्याबरोबरही इंडस्ट्रीत राजकारण झालं. पलाश कधीच कुणाच्या मर्जीप्रमाणे वागायचा नाही. स्वतःच्या अटींवर काम करायचा, त्यामुळे त्याचं बॉलीवूडमध्ये फारसं कुणाशी जमलंच नाही. हळुहळू तो इंडस्ट्रीपासून दूर गेला. पलाश सेन आता डॉक्टर म्हणून काम करतोय. तसेच कधी कधी तो गायनाचे कार्यक्रमही करतो.