Dhurandhar 2 Aditya Dhar Controversy: एकीकडे ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडतोय, तर दुसरीकडे या चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रियाही उमटत आहेत. प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने आपल्या नवीन व्हिडीओमध्ये दिग्दर्शक आदित्य धर आणि त्याच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटावर सडकून टीका केली आहे. ध्रुवने ‘धुरंधर’वरही टीका केली होती, आता दुसरा भाग काही घटनांना चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्याने केला आहे.

Dhurandhar 2 Exposed – What They Don’t Show You (धुरंधर २ एक्सपोज्ड – जे ते तुम्हाला दाखवत नाही) असं शीर्षक त्याने व्हिडीओला दिलंय. हा चित्रपट फक्त देशाचा अपमान करत नाही तर नागरिकांचाही अपमान करतो, असं स्पष्ट मत ध्रुव राठीने मांडलं आहे.

‘व्हॉट्सॲप फॉरवर्ड्सनी प्रेरित चित्रपट’

चित्रपटाच्या सुरुवातीला ‘ही कलाकृती सत्य घटनांपासून प्रेरित असून काल्पनिक आहे’ असा जो डिस्क्लेमर दिला आहे, त्याला ध्रुवने ‘लीगल चीट कोड’ म्हणजेच कायदेशीर पळवाट म्हटलं आहे. “आदित्य धर याने व्हॉट्सॲप फॉरवर्ड्सच्या आधारे हे सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार केलं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला ‘सत्य घटनांनी प्रेरित’ म्हणण्यापेक्षा ‘व्हॉट्सॲप फॉरवर्ड्सनी प्रेरित’ असं म्हणणे अधिक योग्य ठरलं असतं,” असं ध्रुव राठी म्हणाला.

Award Banner

नोटबंदीच्या मुद्द्यावरून ध्रुव राठीची टीका

ध्रुवने या चित्रपटात नोटबंदीचे चित्रण ज्याप्रकारे केलेय, त्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. चित्रपटात नोटबंदी हा एक ‘मास्टरस्ट्रोक’ असल्याचे दाखवलं आहे, पण वास्तव त्यापेक्षा वेगळं आहे, असं ध्रुवने म्हटलंय. ध्रुव म्हणाला, “लॉजिकली विचार केला तर तुम्हाला प्रश्न पडेल की खरंच यात काही अर्थ आहे का? एका छोट्याशा मुद्द्यासाठी इतका मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो का?” ध्रुवने चित्रपटातील दावे खोडून काढण्यासाठी आरबीआयचे अहवाल आणि विविध रिसर्च पेपर्सचा संदर्भ दिला. नोटाबंदीनंतर एटीएमच्या रांगेत उभे असताना अनेकांचा मृत्यू झाला आणि अनेकांना हृदयविकाराचा झटका आला, या वास्तवाकडेही त्याने लक्ष वेधले.

ध्रुव राठीचा सर्वोच्च न्यायालयाला सवाल

युट्यूबर ध्रुव राठीने निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला प्रश्न विचारला. एखाद्या राष्ट्रीय राजकीय पक्षाला ‘देशविरोधी’ दाखवणारा असा चित्रपट बनवण्याची परवानगी आहे का? ज्यात एका राजकीय नेत्याला चांगलं दाखवण्यासाठी खोट्या गोष्टी सांगितल्या जातात, असा प्रश्न ध्रुवने उपस्थित केला. “जर हे चालत असेल, तर भविष्यात आश्चर्य वाटायला नको, कारण अनेक लोक याच पद्धतीने याच पक्षाविरुद्ध चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतील,” असं स्पष्ट मत ध्रुवने मांडलं.

दरम्यान, धुरंधर २ हा स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यात काही सत्य घटनांनाच उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी या कलाकारांनी काम केलंय. या चित्रपटाने एका आठवड्यात जगभरात १,००० कोटींचा व्यवसाय केला आहे.