Dhurandhar 2 Box Office Advance Booking: सध्या ‘धुरंधर २’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, याचे कारणही तसेच आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाच्या शेवटी हमजाने रेहमान डकैतचा खून केला. तसेच, हमजाचे आधीचे आयुष्य कसे होते, याची झलकही पाहायला मिळाली; त्यामुळे ‘धुरंधर २’मध्ये नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘धुरंधर’ थिएटरमध्ये असतानाच निर्मात्यांनी ‘धुरंधर २’ची घोषणा केली होती. हा सिनेमा १९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
याबरोबरच, ‘धुरंधर २’च्या ॲडव्हान्स बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. तसेच, पेड प्रीव्ह्यूसाठीदेखील सध्या ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. संपूर्ण जगभरात प्रेक्षक ‘धुरंधर २’ पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत.
अमेरिका आणि कॅनडामध्ये ॲडव्हान्स बुकिंगमधून ‘धुरंधर २’ने ७ लाख ५० हजार रुपयांची कमाई केली आहे, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवशी एक दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त कमाई करेल. तसेच पहिल्या आठवड्याच्या शेवटी २ दशलक्ष डॉलर कमाई होईल.
सध्या भारतात फक्त पेड प्रीव्ह्यूसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. आतापर्यंत देशभरात ३.५ लाख तिकिटे विकली गेली आहेत, त्यामुळे ‘धुरंधर २’ची प्रदर्शित होण्यापूर्वीच भारतात आतापर्यंत १९ कोटींची कमाई झाली आहे.
पेड प्रीव्ह्यू म्हणजे काय?
चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो सिनेमा पाहता येणार आहे. १९ मार्चला ‘धुरंधर २’ प्रदर्शित होणार आहे, त्याआधी १८ तारखेला ज्यांना हा सिनेमा पाहायचा आहे, त्यांना पाहता येणार आहे, त्यासाठी सध्या ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे.
चित्रपटाच्या तिकिटांची ज्या पद्धतीने विक्री होत आहे, ते पाहून हा सिनेमा पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम मोडणार का, असा प्रश्न पडला आहे. या आधी प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाने ९०.७ कोटींची कमाई केली होती.
आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमामध्ये रणवीर सिंह, सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. तसेच, इमरान हाश्मीदेखील ‘धुरंधर २’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे, त्यामुळे आता हा सिनेमा किती कमाई करणार, प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
