Anupam Kher Defends Dhurandhar 2 : ‘धुरंधर २’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. फक्त प्रेक्षकच नव्हे, तर अनेक कलाकार मंडळींनीही हा चित्रपट पाहिला असून, अनेक कलाकारांनी कौतुकही केलं आहे. परंतु, ‘धुरंधर २’चं जसं कौतुक होत आहे, त्याचप्रमाणे त्यावर टीकासुद्धा केली जात आहे. आदित्य धरच्या या चित्रपटाला काही जण प्रोपगंडा फिल्म म्हणत आहेत.

सोशल मीडियासह सर्वत्र आदित्य धर लिखित व दिग्दर्शित व रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर २’बद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिसत होत आहे. लोक या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक करीत असले तरी काही जण यावर तीव्र शब्दांत निषेध करतानाही दिसले. अनेकांनी पोस्ट शेअर करीत त्यांना हा चित्रपट आवडला नसून, हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, असंही म्हटल्याचं सोशल मीडियावरून पाहायला मिळतं. अशातच आता ‘धुरंधर २’वर टीका करणाऱ्यांना आणि चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्यांना लोकप्रिय बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सुनावलं आहे.

अनुपम खेर बॉलीवूडमधील असे अभिनेते आहेत, जे नेहमीच इंडस्ट्रीतील गोष्टींबद्दल त्यांची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अशातच आता ‘धुरंधर २’ला प्रोपगंडा फिल्म म्हणणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी अशा लोकांना रेस्ट इन पीस, असंही म्हटलं आहे. अनुपम खेर नेमकं काय म्हणाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

Award Banner

अनुपम खेर यांनी सुनावलं

दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या (IFFD) आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २०२६ मध्ये अनुपम खेर यांनी याबद्दल म्हटलं आहे. अनुपम खेर ‘धुरंधर २’ला प्रोपगंडा फिल्म म्हणणाऱ्यांबद्दल म्हणाले, “मला असं वाटतं की, जे लोक चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म म्हणत आहेत, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. ते अनावश्यक लोक आहेत. त्यांचा काहीही संबंध नाही. “

चित्रपटाचा पहिला भाग रिलीज झाल्यापासून ‘धुरंधर’वर अल्पसंख्याकांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप होत आहे. ‘धुरंधर २’ आल्यानंतर ही टीका आणखी वाढली. या भागात केंद्र सरकारच्या काही धोरणांना, विशेषतः २०१६ च्या नोटाबंदीला चांगलं दाखवल्याचा आरोप केला जात आहे.

अनुपम खेर पुढे म्हणाले, “कश्मीर फाइल्सचं, धुरंधरचं यश साजरं करूयात. लोक १२ वाजताचा शो हाऊसफुल करीत आहेत. लोक मूर्ख नाहीयेत. त्यांना चित्रपट आवडत आहे म्हणून ते पाहत आहेत आणि मला असं वाटतं की, जे लोक प्रोपगंडा फिल्म म्हणत आहेत, त्यांना आपण रेस्ट इन पीस, असं म्हणायला हवं.”

दरम्यान, ‘धुरंधर २’नं आतापर्यंत जगभरात १,३९२,२३ इतकं कलेक्शन केलं आहे. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार ‘धुरंधर २’ आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट असल्याचं म्हटलं आहे.