Ameesha Patel Talks About Dhurandhar 2 : ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येनं चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. सोशल मीडियावरही चित्रपटातील सीन्सचे रील, संवाद व्हायरल होत आहेत. अनेक जण रणवीर सिंहच्या अभिनयाचं आणि आदित्य धरच्या दिग्दर्शनाचं कौतुक करत आहेत.
प्रेक्षकांबरोबरच कलाकार मंडळीसुद्धा ‘धुरंधर २’बद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी तर सोशल मीडियावरून आदित्य धरच्या ‘धुरंधर २’चं भरभरून कौतुक केलं. तर बॉलीवूडमधील काही कलाकारसुद्धा याबद्दल बोलत आहेत. अशातच आता बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अमिषा पटेल हिनंसुद्धा ‘धुरंधर २’बद्दलची तिची प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीनं यावेळी ‘धुरंधर २’ला डोळे उघडणारा चित्रपट असल्याचं म्हटलं आहे.
अमिषा पटेल बॉलीवूडमधील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जे इंडस्ट्रीतील गोष्टींबद्दलची त्यांची मतं, प्रतिक्रिया ठामपणे मांडत असतात. अमिषा सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि त्यामार्फत तिच्या खासगी व व्यावसायिक आयुष्याबद्दलच्या अपडेट्स देत असते. अशातच आता एक्सवर ट्वीट करत आदित्य धरच्या ‘धुरंधर २’बद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामधून तिनं बॉलीवूडमधील चित्रपटांत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची निवड करणाऱ्यांना सुनावलं आहे. तिनं चित्रपट बनवला पाहिजे; प्रोजेक्ट नाही, असंही म्हटलं आहे.
अमिषा पटेल धुरंधर २बद्दल काय म्हणाली?
अमिषा ‘धुरंधर २’बद्दल म्हणाली, “डोळे उघडणारा चित्रपट. इंडस्ट्री ‘धुरंधर’चं कौतुक करत आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे. इंडस्ट्रीतीला कळायला हवं की, आदित्य धरनं चित्रपट बनवला; प्रोजेक्ट नाही. कलाकारांची निवड केली; इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असलेल्या लोकांची निवड केली नाही. चित्रपट बनवणं सुरू करा आणि प्रोजेक्ट बनवणं बंद करा.” अमिषाला ‘धुरंधर २’ आवडला असून, तिनं त्यामधून चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.
दरम्यान, सध्या ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. आतापर्यंत चित्रपटानं कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. घरगुती बॉक्स ऑफिससह जगभरातही चित्रपटानं कोट्यवधींचं कलेक्शन केलं आहे. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार चित्रपटानं आतापर्यंत जगभरात ११.६४ कोटींची कमाई केली आहे.
अमिषा पटेलसह आलिया भट्ट, राकेश रोशन, राजुकमार राव, विकी कौशल, रितेश देशमुख, महेश बाबू, अल्लु अर्जुन, ज्युनिय एनटीआर यांसारख्या दाक्षिणात्य व बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. परंतु, काही कलाकारांनी चित्रपटावर टीकासुद्धा केली आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज.
