Dhurandhar 2 Box Office Collection Day 1 : आदित्य धर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘धुरंधर २’ हा चित्रपट अखेर १९ मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या धुरंधर २ ची इतकी क्रेझ आहे की चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षक गर्दी करत आहे. धुरंधरच्या घवघवीत यशानंतर आता धुरंधर २ च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.
‘धुरंधर २’ चे पेड प्रिव्ह्यूज १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यानंतर सुरू करण्यात आले होते. या पेड प्रिव्ह्यूजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तांत्रिक अडचणींमुळे देशभरातील काही शो रद्द होऊनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आणि अनेक विक्रम मोडले आहेत.
धुरंधर २ चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन
‘धुरंधर: द रिव्हेंज’ म्हणजेच धुरंधर २ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील २१,७२८ शोमधून या चित्रपटाने पहिल्या दिवशी १०२.५५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. बॉलीवूडमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रम मोडीत काढला आहे. : हा केवळ सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपटच ठरला नाही, तर पहिल्या दिवशी एवढी मोठी कमाई करणारा हा भारतातील पहिला ‘A’ सर्टिफिकेट मिळालेला चित्रपट ठरला आहे. ‘पेड प्रिव्ह्यूज’मधून या चित्रपटाने ४४ कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १४६.५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
धुरंधरने या मोठ्या चित्रपटांना टाकले मागे
‘धुरंधर २’ ने प्रभासच्या ‘सालार’ आणि ‘कल्की २८९८ एडी’ यांसारख्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकलं आहे. आता हा चित्रपट यशच्या ‘केजीएफ: चॅप्टर २’ च्या जवळ पोहोचला आहे. ‘धुरंधर २’ भारतात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या ५ चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे. या यादीत पुष्पा २: द रूल (१६४.२५ कोटी), RRR (१३३ कोटी), बाहुबली २ (१२१ कोटी) आणि केजीएफ २ (११६ कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच धुरंधर २ हा पेड प्रिव्ह्यूमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
आदित्य धर लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित धुरंधर २ मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. तसेच अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि दानिश इक्बाल या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
