Dhurandhar 2 Box Office Collection Day 10: धुरंधर प्रमाणेच धुरंधर २ मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. हा सिनेमा दररोज नवीन रेकॉर्ड करत आहे. १९ मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
प्रेक्षकच नाही तर कलाकारही या सिनेमावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण सिनेमाचे, कलाकारांचे कौतुक करत होते. आदित्य धरने ज्या पद्धतीने चित्रपटाची गोष्ट मांडली आहे, दिग्दर्शन केले आहे, त्याचे अनेकजण कौतुक करत आहेत. तर काही कलाकार टीकादेखील करत आहे. हा सिनेमा म्हणजे प्रोपगंडा असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. सिनेमाबद्दल प्रेक्षक-कलाकारा यांची मतमतांतरे असली तरीही सिनेमाच्या कमाईत मात्र वाढ होताना दिसत आहे.
‘धुरंधर २’ने १० व्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची केली कमाई
आता या सिनेमाने दहा दिवसांत भारतात तसेच संपूर्ण जगभरात किती कमाई केली, हे जाणून घेऊ…
सॅल्कनिकनुसार, धुरंधर २ ने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या शनिवारी म्हणजेच २८ मार्चला ६२.८५ कोटींची कमाई केली. यांसह चित्रपटाने ७७८.७७ कोटींची कमाई केली. तर जगभरात या सिनेमाने १२२६. ४४ कोटींची कमाई केली आहे.
हिंदी भाषिक प्रदेशात सिनेमाने दहाव्या दिवशी ५८ कोटींची कमाई केली. तर तेलुगु भाषेत सिनेमाने ३ कोटींची कमाई केली. आता आगामी काळात सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, चित्रपट कमाईचे कोणते नवीन रेकॉर्ड तयार करणार, धुरंधर २ आणखी किती कमाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
धुरंधर २ मध्ये रणवीर सिंहबरोबरच संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी, आर माधवन, मानव गोहिल,गौरव गेरा हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले.
धुरंधरची गोष्ट हामजा, रेहमान डकैत यांच्याभोवती फिरताना दिसली होती. आता धुरंधर २ मध्ये पाकिस्तानमध्ये जाण्याआधी त्याचा काय भूतकाळ होता, रेहमान डकैतला मारल्यानंतर पुढे काय घडले, हे पाहायला मिळते. धुरंधरमध्ये अक्षय खन्नाचा अभिनय, त्याच्या डान्सची चर्चा होताना दिसली होती. आता धुरंधर २ पाहिल्यानंतर प्रेक्षक इतर कलाकारांबरोबरच राकेश बेदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. धुरंधर चित्रपटाने भारतात ८०० कोटींहून अधिक कमाई केली होती. इतकी कमाई करत चित्रपटाने आधीचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. त्यामुळे, धुरंधर २ च्या कमाईकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
