Dhurandhar 2 Box office Collection day 19: ‘धुरंधर’ सिनेमा जितका गाजला तितकाच ‘धुरंधर २’ या सिनेमाची देखील चर्चा झाली. अनेक कलाकार, दिग्दर्शक व निर्माते यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमाचे कौतुक केले. तर, अनेकांनी टीकाही केली. मात्र, या सगळ्याचा सिनेमाच्या कमाईत काहीही फरक पडला नाही.
रणवीर सिंहच्या सिनेमाचं १९ दिवसांचं कलेक्शन किती?
१९ मार्च २०२६ ला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने १९ दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आरआरआर, केजीएफ अशा प्रचंड कमाई केलेल्या सिनेमांना धुरंधर २ ने कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले. फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता १९ दिवसांत या सिनेमाने किती कमाई केली, हे जाणून घेऊ…
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ या सिनेमाने १९ व्या दिवशी १० कोटींची कमाई केली. यांसह चित्रपटाची १९ दिवसांची भारतातील एकूण कमाई १०२३.७७ कोटी इतकी झाली आहे. तर, जगभरात या सिनेमाने १६२२.७२ कोटींची कमाई केली आहे.
भारतात बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा पार करणारा धुरंधर २ हा पहिला बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. तर पुष्पा २ व बाहुबली २ नंतर तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. पुष्पा २ ने भारतात ११२०. १० कोटींची कमाई केली होती. तर बाहुबली २ या सिनेमाने १४३० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे पुष्पा २ ला मागे टाकण्यासाठी धुरंधरला आणखी १२० कोटी कमावण्याची गरज आहे.
या सिनेमात रणवीर सिंहसह, राकेश बेदी, संजय दत्त, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, आर.माधवन हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले.
डिसेंबर २०२५ प्रदर्शित झालेल्या धुरंधर सिनेमाचे देखील प्रचंड कौतुक झाले. नुकताच स्क्रीन पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सिनेमाने १४ पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक या पुरस्कारांनी रणवीर सिंह व आदित्य धर यांना गौरविण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार अक्षय खन्नाला मिळाला.
दरम्यान, आगामी काळात धुरंधर २ सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
