Dhurandhar 2 Box Office Collection Day 2: ‘धुरंधर द रिव्हेंज’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत. जवळपास चार तासांचा रनटाइम असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाने पहिल्या दिवशी जगभरात २४० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी भारतातील बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.

रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या धुरंधर २ ने ९६.७६ कोटी रुपयांची कमाई केली. यापैकी सर्वाधिक कमाई हिंदी सिनेमातून झाली आहे. तांत्रिक कारणामुळे ‘पेड प्रिव्ह्यूज’ आणि सुरुवातीचे दोन दिवस तमिळ व तेलुगू आवृत्ती सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकली नव्हती. धुरंधर २ तमिळ व तेलुगू भाषेत आज रिलीज होणार आहे.

धुरंधर २ चे भारतातील कलेक्शन

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, धुरंधर २ या चित्रपटाची भारतातील एकूण कमाई अंदाजे २२६.२७ कोटी रुपये इतकी झाली आहे. भारतात पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा विक्रम मोडण्यासाठी या चित्रपटाला दोन दिवसांत आणखी १२८ कोटी रुपयांची गरज आहे. हा विक्रम सध्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या नावावर आहे.

धुरंधर २ सिनेमाने दुसऱ्याच दिवशी कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाने दुसऱ्या दिवसांच्या कलेक्शनच्या बाबतीत यशचा ‘केजीएफ: चॅप्टर 2’ला मागे टाकलं आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ९०.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच धुरंधर २ ने ‘पुष्पा २’चा रेकॉर्डही मोडला आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ९६ कोटी रुपये कमावले होते.

या वीकेंडचे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अजून बाकी आहेत. या दोन दिवसांत हा सिनेमा किती कमाई करतो ते पाहणं महत्वाचं ठरेल. सध्याची आकडेवारी पाहता ‘धुरंधर २’ हा चित्रपट ‘पुष्पा २’ ने पहिल्याच आठवड्याच्या शेवटी ३५४ कोटी रुपये कमावण्याचा विक्रम केला होता, तो मोडेल असं दिसतंय. आता धुरंधर २ तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे त्याच्या कमाईत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी चित्रपटाचे कलेक्शन १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

धुरंधर २ मधील कलाकार

या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेला, मानव गोहिल, उदयबीर संधू, दानिश इक्बाल हे कलाकार आहेत. तसेच या चित्रपटात आदित्य धरची पत्नी अभिनेत्री यामी गौतम हिने कॅमियो केला आहे.